बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश
मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील व बुलढाणा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी जलसंपदा विभाग, ऊर्जा विभाग, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी व बुलडाणा जिल्ह्यातील संबधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
बौद्ध स्तुपाचे जतन व संवर्धन
जिगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भोन या गावात पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार इ.स.वी.सन पूर्व तिसऱ्या शतकातील (सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या) बौद्ध स्तुपाचे अवशेष सापडले आहेत. या स्तुपाचे तसेच इथे आढळलेल्या इतर प्रचीन वास्तूंचे आणि सामुग्रीचे जतन व संवर्धन करण्यात यावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
पेनटाकळी प्रकल्पाला बंदिस्त कालवा
पेनटाकळी प्रकल्पाचा मुख्य कालव्याला अस्तरिकरण करण्याऐवजी आर सी सी ट्रॅफ (बंदिस्त कालवा) तयार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.पेनटाकळी हा प्रकल्प हा मोठा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीवर पेनटाकळी गावांच्या वरिल बाजूस बांधण्यात आला आहे. अस्तरिकरण असलेल्या मुख्य कालव्याऍवजी आर सी सी ट्रॅफ चा पर्याय तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याबाबत विभागाने कळविले आहे. तसा प्रस्ताव नियामक मंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
पुनर्वसित गावठाण पार्डी, ता. लोणार करिता वीज जोडणी
बोरखेडी मिश्र संग्राहक ल.पा. योजना लोणार तालुका जि. बुलडाणा या योजनेच्या बुडीत क्षेत्रात मौ. पार्डी हे गावठाण येते. या प्रकल्पांतर्गत नवीन पुनर्वसित गावठाणासाठी पाण्याच्या नवीन वीज कनेक्शनसाठी ऊर्जा विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आलवेडी आणि अरकचेरी या लघु पाटबांधारे प्रकल्पांना, तसेच देऊळगांवराजा येथिल खडकपुर्णा प्रकल्पास पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंबधी चर्चा झाली. हे प्रस्ताव काही त्रुटींच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे. सदर त्रुटींची पूर्तता करून सर्व प्रकल्पांना गती देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी केली आहे.