राजकीय साठमारीत सर्वसामान्यांचा जीव टांगणीला
ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा मागचे दिवस पुढे येण्याची शक्यता
पाबळ : सध्या महाराष्ट्राच्या कारभाराला वेगळे वळण लागले असल्याचे दिसून येत आहे. मूळ कारणांचा विसर पडून राजकीय पक्षांमध्ये राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. त्याचवेळी ओमायक्रॉन नावाचा नवा विषाणू हातपाय पसरू लागला असल्याने गावागावातील जनतेला मात्र घोर लागला असल्याचे दिसून आहे, अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांना वस्तुस्थितीचे भान येणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एकदा मागचे दिवस पुढे येण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेली दोन वर्षे करोनाच्या लाटेत देशासह राज्याचे अतोनात नुकसान झाले. त्यातून बाहेर पडत असताना पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचे अनुमान काढणे सुरू झाले आहे. या बाबतीत जनता तितकीच अनभिज्ञ आहे. यासाठी पूर्वानुभव विचारात घेत नव्या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी राजकीय कलगीतुऱ्यात रमलेल्या राजकारणाला जाग येण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर वेगळेच घडले आणि त्रिपक्षीय सरकार अस्तित्वात आले.
त्याचवेळी हे सरकार आपोआप कोसळेल अशी अटकळ बांधून भाजपने विरोधात बसण्याची भूमिका स्वीकारली. मात्र हीच विरोधाची भूमिका प्रबळ होत गेली. तशीच त्रिपक्षीय सरकारही अतूट होत गेले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी अटीतटीची लढाई सुरू झाली. त्यामध्ये विकासापेक्षा चाल आणि संरक्षण यातच वेळ जात असल्याचे चित्र पुढे आले असल्याने जनतेतही याची कुजबुज सुरू होऊ लागली आहे.
मागील दोन वर्षाच्या काळात सर्व देश एकत्र होऊन करोनाशी लढला. त्यात कमी अधिक नुकसान झाले असले तरी पुन्हा उभा राहण्याकडे वाटचाल करू लागला. त्यातच नव्या विषाणूचे सावट येत असल्याने व राजकीय क्षेत्रात हाताबाहेर चाललेली राजकीय कुरघोडी यामुळे जनतेत अस्वस्थता पसरू लागल्याचे दिसून येत आहे.
कुरघोड्या आणि राजकीय धक्क्यात वाढ-
सध्या सुरू होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सत्तेवरील तसेच विरोधातील पक्षांची सुरू असल्याची सुप्त बाब उघड झाली आहे.त्यातूनच अंतिम कुरघोड्या आणि राजकीय धक्क्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याचीच एक झलक अधिवेशनातून व विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून पुढे आली आहे. तर या गोष्टींचे सरळ सरळ चित्रीकरण सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा पाहता येत असल्याने जनतेतून सुज्ञ अपेक्षा व्यक्त होत आहेत.
खेळ कुठपर्यंत खेळला जाणार?
राजकीय सारीपाटात केंद्राच्या मदतीने विरोधातील भाजप कुरघोडी करत असल्याचे चित्र असले तरी ज्येष्ठ राजकीय तज्ज्ञ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडी सरकार सुरक्षित प्रतिडाव टाकून संरक्षित असले तरी हा खेळ कुठपर्यंत खेळला जाणार? हा खरा प्रश्न आहे, अन्यथा या खेळात जनतेच्या जीवाला लागलेला ओमायक्रॉनचा खेळ नवा पत्ता टाकत राहणार हे येणारा काळ ठरवेल हे नक्की.