विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण – सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम
नागपूर : विद्यार्थ्यांना खेळणे आवश्यक असून सर्वांगीण विकासात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांचे खेळाकडे दुर्लक्ष झाले, ते खेळ विसरुन गेले. निरोगी शरीरासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
मेहमुदा शिक्षण आणि महिला ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित सेंट्रल ग्रृप ऑफ इंस्टिट्यूशन लोणारा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पर्वावर वार्षिक क्रीडा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष अनिस अहमद, डॉ. अनवर दाऊद, विलास शिंदे, डॉ. गुरुशास्त्री, डॉ. ओवेस हसन, मेहमुद कमर, नॅशअली, दीपक पटेल, अतुल कोटोजा, जिल्हा परिषद सदस्या कुंदा राऊत यावेळी उपस्थित होते.
खेळाद्वारे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन खेळाडूसाठी प्रतियोगी व आव्हानात्मक वृत्ती निर्माण होते. म्हणून आव्हानांना समोर ठेवून त्यावर लक्ष केंद्रीत करता येईल, असे डॉ. कदम यांनी सांगितले.
विविध खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. खेळाचे जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. व्यक्तिमत्व व आत्मविश्वासात वाढ होऊन शारीरीक व मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. खेळामुळे स्वस्थ व निरोगी शरीर ठेवून कोरोना सारख्या महामारीत रोगप्रतिकारक शक्ती आपणास वाढविता येते, असे माजी मंत्री अनिस अहमद यांनी सांगितले.
महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा क्रीकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, टग ऑफ वार, बॅडमिंटन, खोखो, कबड्डी, आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात झुल्फेकार भुट्टो, डॉ. अल्ताफ अहमद, अतुल कोटेजा, अशफाक अहमद, अहेफाज कुरेशी, गुलाब भोयर, प्रविण विहने, मौलाना अब्दुल, इल्हास इकबाल महमुद, जुनेद, अजय वैतागे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. अब्दुल आहद यांनी केले तर मान्यवरांचे आभार डॉ. यास्मीन सिद्दिकी यांनी मानले. निजाम अन्सारी, शकील अन्सारी, सय्यद मुमताज, गोपालपट्टम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.