सैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा
-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
पुणे,दि.16: भारत-पाकिस्तानातील 1971 च्या युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येणारा सैनिकांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यानात पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित तयार करण्यात आलेल्या थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफितीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चौधरी, उपमहापौर सुनीता वाडेकर, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, गटनेते आबा बागुल उपस्थित होते.
श्री. थोरात म्हणाले, इतिहास जिवंत करण्याचे काम या थ्रीडी शोच्या माध्यमातून झाले आहे. शहीद जवानांमुळे आपण सुखद जीवन जगत आहोत. या शूरवीरांना अभिवादन करणारा आजचा दिवस आहे. शौर्याचा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. ते काम आज या माध्यमातून होत आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, 1971 च्या विजयाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, यामुळे संपूर्ण देशात आज विजयोत्सव साजरा केला जात आहे. 1971 च्या युद्धात सैनिकांनी केलेली कामगिरी देश कधीही विसरू शकत नाही. पुण्यातील वसंतराव बागुल उद्यानातील लेझर शो च्या माध्यमातून युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना वाढेल, असे ते म्हणाले.
श्री. आबा बागुल यांनी प्रास्ताविक करताना पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया लेझर शोबाबत माहिती दिली. चित्रफीत पुणे महापालिकेतर्फे कै. वसंतराव बागुल उद्यानात रोज सायंकाळी दाखवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, निवृत्त ब्रिगेडियर प्रकाश घोगले, निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सैन्य दलातील सेवा निवृत्त अधिकारी, नागरिक, युवक, उपस्थित होते.