लोकाभिमुख कामात शासन कोठेही कमी पडणार नाही – गृह (शहरे) व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील Copy
सांगली : पलूस शहरासाठीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन हे एक ऐतिहासीक काम स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती दिनानिमित्त करत आहोत. पलूस शहराचा सर्वांगीण विकास स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेलाच आहे. परंतु जी राहिलेली कामे असतील ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. लोकाभिमुख कामात शासन कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही गृह (शहरे) व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी दिली.
पलूस येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पलूस शहरासाठी 37 कोटी 48 लाख रूपये रक्कमेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याहस्ते व सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष परशुराम शिंदे, मुख्याधिकारी सुमित जाधव, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषद समाज कल्याण माजी सभापती खाशाबा दळवी, स्वप्नाली कदम, पलूस नगरपरिषद गटनेते सुहास पुदाले आदि मान्यवर उपस्थित होते.
गृह (शहरे) व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील म्हणाले, राज्याला पुढे घेवून जाण्याची भूमिका स्वीकारण्याचा व चांगल्या हिताच्या गोष्टी कशा करता येतील हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोविड मध्ये मा. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख देशपातळीवर झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर आल्यानंतर निश्चितपणे आपले राज्य प्रगतशील राज्य म्हणून जे देशामध्ये ओळखले जाते ते पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न आम्हा सर्वांचा राहील. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा नोकरभरतीचा विषय असेल या सगळ्यामध्ये एक पाऊल पुढे जावून चांगल्या पध्दतीने निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
पाणी किती महत्वाचे आहे आपण सर्वजण जाणतो. पाण्यामुळे या भागाची स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेली क्रांती आणि या भागाचा केलेला विकास याचा साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आहे. लोकांना जागच्या जागेवर मदत करण्याची भूमिका स्व. डॉ. पतंगराव कदम यांची होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे एक दुष्काळग्रस्त असणारा परिसर सुजलम सुफलम, आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखला जातो. पलूस शहारासाठीची पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून नागरिकांना 24x७ पिण्याचे पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करावा असे ते म्हणाले. पलूस शहराला एक विकसनशील शहर म्हणून घेवून जाण्याचा प्रयत्न निश्चित कराल. वेगवेगळ्या योजना चांगल्या पध्दतीने राबवाल अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.
सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, यशवंत पाणी पुरवठा ही बंद पडलेली योजना स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून सुरू करून पलूसला जीवनदान दिले. पलूस पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज केले असून पलूसची पुढील 30 वर्षातील वाढती लोकसंख्या विचारात घेवून या पाणी योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी भारती विद्यापीठाची 30 गुंठे जागा पलूस नगरपरिषदेला देण्यात आली आहे. या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करू. पलूसच्या विकासाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या शहाराचा सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या विविध विकास कामांचा उहापोह केला.
प्रारंभी स्व. डॉ. पतंगराव कदम व कै. वसंतराव पुदाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी श्रीपतराव कदम प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे बुर्ली हनुमान मंदिर जिर्नोध्दारसाठी 5 लाख रूपयांचा धनादेश मान्यवरांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जीवनावर श्री. पवन चव्हाण यांनी लिहिलेल्या साहेब एक विलक्षण जिद्दीची कहाणी या पुस्तिकेचे प्रकाशनही मानव्यरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गिरीष गोंदिल व समाज कल्याण माजी सभापती खाशाबा दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष परशुराम शिंदे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सुहास पुदाले यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार नगरसेविका प्रतिभा डाके यांनी मानले.
दरम्यान या कार्यक्रमापूर्वी तालुका क्रीडा संकुल पलूस येथे बहुउद्देशिय हॉल, व्यायामशाळा व प्रसाधनगृह या १ कोटी रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याहस्ते व सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास पलूस नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.