‘सेंट्रल मार्ड’ संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक
मुंबई : राज्यातील शासकीय व महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (एमडी/एमएस) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या “सेंट्रल मार्ड” संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
विधानभवनात ‘सेंट्रल मार्ड’ संघटनेच्या विविध मागण्यांच्याअनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विविध मागण्यांवर सकारात्मक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, आयुक्त वीरेंद्र सिंग, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रतिनिधी आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सन २०२१ ची वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा अद्यापही सुरु असल्याने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा करून याबाबत योग्य ती शिफारस करण्याचे निर्देश.देशमुख यांनी यावेळी संबंधितांना दिले.
मागील ४ ते ५ वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे. परंतु त्याच क्षमतेने सध्या उपलब्ध असलेली वसतिगृहांची क्षमता वाढ झालेली नाही. त्याकरिता नवीन वसतिगृहे बांधकाम आणि सध्या अस्तित्वात असलेल्या वसतिगृहांचा विस्तार करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वरिष्ठ निवासी पदे रुपांतरीत करण्याबाबत सकारात्मक विचार होईल. जेणेकरुन सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना बंधत्रीत सेवा देणे शक्य होणार आहे.
पदव्युत्तर शिक्षणाच्या कालावधीत महिला निवासी डॉक्टर प्रसुती रजेवर असल्यास किंवा निवासी कालावधीमध्ये निवासी डॉक्टरांनी टी.बी.ची लागण झाल्यास त्याकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियमांनुसार कार्यपध्दतीनुसार निवासी डॉक्टरांना अनुज्ञेय असलेल्या रजेसंदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्याचे निर्देश मंत्री.देशमुख यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नीत रुग्णालयातील सुरक्षेच्या दृष्टी आवश्यक आढावा घेवून त्यानुसार सुरक्षेचे बळकटीकरण करण्यासंदर्भात ठोस पाऊले उचलण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.