जिल्ह्याच्या विकसित व अविकसित भागातील अंतर केंद्रीय योजनांच्या माध्यमातून कमी करावे – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
ठाणे । सह्याद्री लाइव्ह। केंद्र शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. खूप जाणिवपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे. ठाणे जिल्हा हा मुंबईलगतचा जिल्हा आहे. परंतु जेवढा भाग विकसित आहे तेवढाच भाग अविकसित असल्याने विकसित व अविकसित या दोघांमधील अंतर या योजनांच्या माध्यमातून कमी करता येईल, असे प्रतिप्रादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
केंद्रपुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) बैठक केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे, विधानसभेचे सदस्य गणपत गायकवाड, प्रमोद पाटील, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अटल मिशन, स्मार्ट सिटी मिशन, सर्व शिक्षा अभियान, मिड-डे मील स्कीम या योजनांचा आढावा पाटील यांनी घेतला.
यावेळी पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजनापेक्षा जास्त निधी हा दिशा समितीला दिलेला दिसतो. केंद्राचा व राज्य सरकारचा तेवढाच निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनांकडे गांभिर्याने घेतले पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विचारपूर्वक दिशा समितीची स्थापना केली आहे. त्याचा आढावा घेतला पाहिजे. त्याची माहिती सर्वांना दिली पाहिजे. आज 29 विषयांचा आढावा घेण्यात आला असून त्याकरीता वेळेत काम होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. राज्य व केंद्र सरकारने विकासासाठी गती घेतली आहे. त्यामुळे केंद्र पुरस्कृत सर्व योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
दिशा समितीचा दर महिन्याला आढावा घेण्याच्या सूचना अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. शिसोदे यांनी योजनांचे सादरीकरण केले.