सर्वसामान्य कुटुंबातील दुर्गाडेंचा दुहेरी प्रवास सुरू
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा संधी : अनुभवी अध्यक्ष मिळाल्याची प्रतिक्रिया
वाल्हे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदी संधी मिळाली.पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी, प्राध्यापक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास झाला आहे. प्रा. दुर्गाडे यांनी पहिल्यांदा 2007 मध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून भरघोस मताधिक्य मिळवत संचालकपदी विराजमान झाले. यानंतरही दुसऱ्यांदाही ओबीसी प्रवर्गातून भरघोस मताधिक्य मिळवत दुहेरी विजय मिळविला होता.
2009 मध्ये जिल्हा बॅंकेवर पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. ते सलग चार वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांना संधी देण्यात आली होती. 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून प्रा. दुर्गाडे यांना पक्षाकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली होती. यावेळी देखील प्रा. दुर्गाडे यांनी देखील दोन नंबरची मते मिळवली होती. प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी, शिक्षण शास्त्र, अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त करून पक्षातील सर्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
जिल्हा बॅंकेचा वाढलेले आर्थिक उलाढाल, तसेच पारंपरिक बॅंकीग व्यवसायात होत असलेले बदल या सर्वांचा विचार करूनच जिल्हा बॅंकेच्या 2022 संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रा. दुर्गाडे यांना या निवडणुकीत “ड’ वर्गातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत प्रा. दुर्गाडे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत सर्वाचेच लक्ष त्याच्याकडे वेधून घेतले होते. त्यामुळे बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांना संधी मिळते का नाही,
याची उत्सुकता होती. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मातब्बर, अनुभवी नावे चर्चेत होती. मात्र, दुर्गाडे यांनी सर्वांनाच मागे टाकले. यावेळी अध्यक्षपद हे जुन्नर, शिरूरच्या वाट्याला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यात जुन्नरमधून संजय काळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत प्रा. डॉ. दुर्गाडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. बॅंकेला एक कार्यक्षम, अनुभवी, अभ्यासू अध्यक्ष मिळाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटली.
विश्वासार्हतेची पोचपावती
दुर्गाडे हे राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ व पवार कुटुंबाच्या अत्यंत जवळचे मानले जातात. दुर्गाडे यांच्यावर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा विश्वास आहे. तसेच सर्वच पक्षामध्ये त्यांचा असलेले मोठा मित्र परिवार, तसेच हुशार व मनमिळाऊ स्वभाव असल्याने, बॅंकीग क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व अर्थशास्त्रातील पीएचडी यामुळे प्रा. डॉ. दुर्गाडे यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला भविष्यात चांगले दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत.
हमालाचा मुलगा दुसऱ्यांदा अध्यक्ष
प्रा. दुर्गाडे यांनी प्रतिकूूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल मुंबईत हमालीचे काम करीत होते. त्यांनी हलाखीत शिक्षण घेऊन महाविद्यालयात लेक्चरशिप केली. 1997 पासून खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय वाटचालीस सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी वाल्हे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. यात ते विजयी झाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुकर झाला. त्यानंतर प्रा. दुर्गाडे यांनी जिल्हा बॅंकेवर आतापर्यंत संधी मिळत गेली. ते दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे.