‘दाम दुप्पट’च्या मोहात डॉक्टर फसला; परप्रांतीय व्यावसायिकाने १५.६० लाखांना गंडविले
डॉक्टरला फोनवरून जीवे मारण्याची धमकी; खेड तालुक्यातील वराळे गावातील घटना, महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चाकण । सह्याद्री लाइव्ह । ‘दाम दुप्पट’च्या आमिषाला ग्रामीण भागातील एक डॉक्टर सपशेल बळी पडला. एका परप्रांतीय किरणा मालाची विक्री करणा-या दुकानदाराने तब्बल १५ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. खेड तालुक्यातील वराळे गावात सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात परप्रांतीय व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. गणेश मुरलीधर सोनवणे (वय ३८, रा. शुभश्री रेसिडेन्सी, आकुर्डी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पप्पु रामदेवाशी (सध्या रा. रोशन वन सोसायटी, वराळे, मूळगाव जादान, ता. खर्ची मारवाड, जि. पाली, राज्य राज्यस्थान) या दुकानदाराविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश सोनवणे हे व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांचा खेड तालुक्यातील वराळे गावात रोशन वन सोसायटीमध्ये ‘संजिवनी हॉस्पिटल’ आहे. डॉ. गणेश सोनवणे यांच्या वराळे येथील हॉस्पिटल शेजारी आरोपी पप्पू रामदेवाशी हा किराणा माल विक्रीचे दुकान आहे. फिर्यादी डॉ. सोनवणे यांचे हॉस्पिटल आणि आरोपी पप्पू रामदेवाशी यांचे किराणा दुकान शेजारी व्यवसाय आहे. शेजारी व्यवसाय असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली होती.
आरोपी पप्पू रामदेवाशी हा परप्रांतीय असल्यामुळे कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. तसेच आरोपी पप्पू याच्या गावाकडील काही मंडळी त्याला भिशीचे पैसेही देत नसतं, त्यामुळे आरोपी पप्पू याने फिर्यादी डॉ. सोनवणे यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा फिर्यादी डॉ. सोनवणे म्हणाले मी काही सावकार नाही, मी एक डॉक्टर आहे. त्यानंतर आरोपी पप्पू याने अनेकदा वेगवेगळी करणे देत आर्थिक मदतीची मागणी केली; मात्र तुम्ही फक्त गुंतवणूकदार म्हणून मला आर्थिक मदत करा, अशी फिर्यादीला सांगितले.
‘तुम्ही जेवढे गुंतवणूक कराल त्याबदल्यात दरमहा नफा व त्याबदल्यात तुमचे पैसे डबल करण्याची जबाबदारी माझी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी एक व्यापारी आहे’, असे फिर्यादी डॉ. सोनवणे यांना आरोपी पप्पू याने आमिष दाखविले. डॉ. सोनवणे यांनी पप्पू रामदेवाशी यांच्यावर विश्वास ठेवत ‘दाम दुप्पट’च्या आमिषाला बळी पडले. व्यवसायात रक्कम डबल करून देतो, असे म्हणून फिर्यादीकडून सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान वेळोवेळी १५ लाख ६० हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत पप्पू रामदेवाशी याने घेतलेले लाखो रुपये परत केले नाहीत.
विश्वास संपादन करून फिर्यादी डॉ. सोनवणे यांच्याकडून घेतलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली म्हणून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीस फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सारंग तपास करीत आहेत.