‘माऊली’ची विधायक ‘वारी’ । माऊली सेवा प्रतिष्ठानकडून गरजूंना कपड्यांचे मोफत वाटप
रंगीबेरंगी कपड्यांचा ढीग पाहून गरजू नागरिकांच्या चेह-यावरील आनंद गगनात मावेनासा
कडूस (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खेड तालुक्यातील वेताळे गावच्या ठाकरवाडी आणि श्रीक्षेत्र कडूस येथील वाघेवाडी परिसरातील गरजू नागरिकांना शनिवारी (दि. २४ जून)कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. रंगीबेरंगी कपड्यांचा ढीग पाहून गरजू नागरिकांच्या चेह-यावरील आनंद गगनात मावेनासा झाला.
राजगुरूनगर येथील नागरिकांकडून लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे जुने परंतु वापरण्यायोग्य असलेले कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर संकलित करण्यात येतात.
माऊली प्रतिष्ठानकडून जमा झालेल्या कपड्यांचे वर्गीकरण करुन ते कपडे खेड तालुक्यात जिथे गरज असेल तिथे वितरित करण्यात येतात. गेल्या दीड महिन्यात ३५ पोती कपडे संकलित झाले. या ३५ पोती कपड्यांचे वाटप शनिवार (दि. २४ जून) करण्यात आले. या कपड्यांचे वाटप वेताळे येथील ठाकरवाडी आणि श्रीक्षेत्र कडूस येथील वाघेवाडीतील गरजू कुटुंबांना करण्यात आले. गरजूंना कपडे मिळाल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
या वेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे, आदर्श शिक्षक संदीप जाधव, कडूस गावचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती नेहरे माजी उपसरपंच कैलास मुसळे, ग्रामपंचायत सदस्य बा. ज. गायकवाड आणि गणेश मंडलिक, ओंकार दुधाळे, सविता लोंढे, दिलीप राक्षे, अर्चना बच्चे आदी उपस्थित होते.
कडूस आणि वेताळे परिसरातील गरजूंना कपडे वाटप करण्यासाठीचे नियोजन अंगणवाडी सेविका इंदूबाई पारधी, मधुकर पारधी, गुलाब खंडवे, मारुती पारधी यांनी केले.