जामशेत व ओतूर धरणाचे परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावे – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक। सह्याद्री लाइव्ह। जामशेत व ओतूर धरणांचे प्रस्ताव शासनास सादर करतांना ते परिपूर्ण असावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.
आज शासकीय विश्रामगृह येथे जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या ओतूर व जामशेत या धरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. याबैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, मृद व जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते, संगीता जगताप यांच्यासह जामशेत व ओतूर धरण क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, या धरणाच्या कामामुळे जामशेत, अंबुर्डी, अंबूर्डी खुर्द व नजीकच्या गावांना लाभ होणार असून शंभर टक्के आदिवासी भागातील साधारण 227 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सुधारित शासन निकषांचा व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले.
ओतूर धरणातून होणारी गळती थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या नवीन पद्धतीच्या तंत्रज्ञान असलेल्या उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. या प्रस्तावास आवश्यक सर्व मान्यता घेवून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्या मान्यतेने परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर शासनास सादर करण्यात यावा, असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बेलसरे व कार्यकारी अभियंता श्रीमती जगताप यांनी ओतूर धरणाबाबतच्या कामाची व मृद व जलसंधारण विभागाचे
अधीक्षक अभियंता काळे व कार्यकारी अभियंता गिते यांनी सादरीकरणाद्वारे जामशेत धरणाबाबत सद्यस्थिती दर्शक माहिती सादर केली.