प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक ।सह्याद्री लाइव्ह । महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. त्या प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन योजना, विद्युत विभाग व बांधकाम विभाग आढावा बैठकित पालकमंत्री भुसे बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विलास गावडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीष खरे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग १ अविनाश पाटील, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, संजय खंदारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता उदय पालवे, सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव कार्यकारी अभियंता शैलेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता विलास पाटील, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग कळवणचे कार्यकारी अभियंता मयुर वसावे यांच्यासह सर्व उपअभियंता उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दादाजी भुसे म्हणाले की, राष्ट्रीयकृत बॅकांच्या माध्यमातून 19 हजार 493 तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून 12 हजार 500 शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. 2017-18, 2018-19 व 2019-20 या तीन वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या निकषास पात्र ठरणार आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज रकमेच्या आधारे जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 हजार 347 शेतकऱ्यांना अनुदान रक्कम प्राप्त झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्यात रक्कम अदा करण्याबाबत पाठपुरावा करावा. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 12 हजार 500 शेतकऱ्यांचे प्रस्तावांची माहिती ॲप मँचिंग न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात जाऊ शकली नाही, परंतु दुसऱ्या टप्प्यात शासनाचे ॲप खुले झाल्यानंतर सदर माहिती अपलोड करण्यात येणार यावेत, असे निर्देश ही पालकमंत्री भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. अवकाळी पाऊस मदतची रक्कम, शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम, प्रोत्साहनपर अनुदान रक्कम, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान यापैकी कोणताही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखाती वळती होऊ नये, असे निर्देशही भुसे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दिवसा शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळावी
दिवसा शेतकऱ्यांना दररोज किमान आठ तास वीज मिळावी यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना दादाजी भुसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या शेतकऱ्यांनी चालु वीजदेयक अदा करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांचा शेतातील माल बाजारात जाणार आहे व विक्रीनंतर शेतकऱ्यांकडे पैसे येतील व चालु वीजदेयकाची रक्कम ते अदा करू शकतील परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. नादुरूस्त झालेले ट्रॉन्सफॉर्मर तातडीने आठ दिवसांच्या आत दुरूस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत, अशा सूचना यांनी विद्युत विभागाच्या आढावा बैठकीत.
अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्त करावेत
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्त करण्याचे निर्देश भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. रस्त्याला पडेलेले खड्डे बुजविण्यासाठी दर्जेदार डांबर, खडी व आवश्यक साहित्य वापरण्यात यावे. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांवर तीन वर्षापर्यंतची जबाबदारी निश्चित करण्यात येवून तीन वर्षाच्या कालावधी अगोदरच जर रस्ते खड्डे पडून खराब झाले असतील तर संबंधित ठेकेदारावर ती जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणारे अपघातांचे 14 ब्लॅकस्पॉट असलेल्या ठिकाणाचे काम येत्या 15 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या शवागारास पालकमंत्र्यांनी दिली भेट
आज सकाळी पालकमंत्री यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयांतील शवागारास भेट दिली. त्या शवागाराची क्षमता वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. तसेच आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांनी शवागारातील मृतदेहांबाबतचा प्रश्न समन्वयाने निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.