सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून तालुक्याचा शैक्षणिक विकास साधणार : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव (उमाका वृत्तसेवा): कोरोनाच्या आर्थिक संकटात जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नसला तरी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक विकास साधणार असल्याची भावना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून एकूण 20 वर्गखोल्यांचे भूमिपूजन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज संपन्न झाले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कार्यकारी अभियंता एस.एम.देवरे, सरपंच पंडीत देसले, पंचायत समिती सभापती सुवर्णा देसले, जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, नागरिक, उपस्थित होते.
राज्य शासन कोरोनामुळे आर्थिक संकटात असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळाची अवस्था बिकट झाल्याचे सांगताना मंत्री भुसे म्हणाले, या शाळांमध्ये सर्वसामान्य पालकांची मुले शिक्षणासाठी येतात. या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या पाहिजे शासन पातळीवरही निधी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. यंदाच्या वर्षात जवळपास सात ते आठ शाळा बांधायला घेत असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून नवीन वर्ग खोल्यांचे काम उभारण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.
ज्ञान दानाचे चांगले कार्य शिक्षक बांधवांनी करावे, आदर्श विद्यार्थी घडवावे असे मंत्री भुसे यांनी सांगतांना, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सामाजिक दायित्व निधीतून मंजूर वर्गखोली बांधकामाचा भूमिपूजन मालेगाव तालुक्यातील साजवहाळ येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साजवहाळ 6 वर्ग खोल्या रु. 59.98 लाख, जिल्हा परिषद शाळा झोडगे 8 वर्ग खोल्या रु. 50 लाख, जिल्हा परिषद लेंडाणे 4 वर्ग खोल्या रु. 50 लाखांच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी केले.
यावेळी त्यांनी साजवहाळ येथे ग्रामपंचायत साजवहाळच्या नुतन वास्तूचे लोकार्पण केले. मंत्री भुसे यांनी जि.प. शाळांच्या विकासासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच साजवहाळ ग्रामस्थांचे सहकार्य व शालेय प्रशासनचा पाठपुरावा या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास घडत असल्याचे सांगतांना, कोरोना काळातील ओट्यावरची शाळा ह्या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले. शालेय गुणवत्तेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शुभेच्छा देत मंत्री स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.