खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ नोंदीसाठी लाच स्वीकारणा-या तलाठी महिलेस रंगेहाथ पकडले
‘एसीबी’च्या अधिका-यांनी चाकणच्या आंबेठाणमधील तलाठी कार्यालयात लावला होता सापळा
चाकण : पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ नोंदीसाठी लाच स्वीकारणा-या तलाठी महिलेस पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. १६) रंगेहाथ पकडले. चाकणमधील आंबेठाण येथील तलाठी कार्यालयात ‘एसीबी’च्या पुणे विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
वर्षा मधूकर धामणे (वय ४५, रा. तलाठी, सजा म्हाळूंगे, अतिरिक्त कार्यभार आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. खासगी व्यक्ती अकबर (पूर्ण नाव, पत्ता, उपलब्ध नाही) याच्यावरही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (पुणे) सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय तक्रारदार हे यांनी सन २०१७ मध्ये म्हाळूंगे गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत होते. मात्र तलाठी कार्यालयातून नोंदीचे काम होत नव्हते.
तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारल्यानंतर खासगी व्यक्ती अकबर यांच्याकडून सात-बारा नोंदीसाठी सुरवातीला एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तलाठी धामणे यांनी ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच बुधवारी (दि. १६) स्वीकारली. त्यावेळी ‘एसीबी’च्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करीत आहेत.