पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ खेड तहसीलदार कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी; पत्रकारांची मागणी
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा राज्यभरातील पत्रकारांकडून निषेध केला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरु पत्रकार संघाच्या वतीने गुरुवार १७ ऑगस्ट रोजी खेड तहसीदार कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.
आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई व्हावी या मुख्य मागणीसोबत आपल्या विविध मागण्या निवेदनातून मांडल्या. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी शासनाच्या वतीने हे निवेदन स्विकारले.
यावेळी हुतात्मा राजगुरु पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव गौतम पाटोळे, उपाध्यक्ष महादेव पारखे आणि विवेक बच्चे, निमंत्रक अविनाश राळे, यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अनिराज मेदनकर, अनिल जोगदंड, बद्रीनारायण घुगे तसेच मार्गदर्शक राहुल चव्हाण आणि सचिन शिंदे उपस्थित होते.
पत्रकारावर हल्ला करवणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली. त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायदा लागु करण्यासाठी टाळाटाळ करणा-या पोलीस अधिका-यावर कारवाई व्हावी आणि पत्रकार हल्याविषयीचे खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी हुतात्मा राजगुरु पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आल्या.