आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी गांभीर्याने घ्या
शरद बुट्टे पाटील यांचे राजकीय नेत्यांना आवाहन
राजगुरूनगर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना सर्वाधिक प्रामाणिक असलेला आदिवासी ठाकर समाज अजूनही मुख्य प्रवाहात आलेल नाही. या आदिवासी ठाकर समाजामध्ये शिक्षणाचा अभाव, व्यसनाधीनता आणि त्यातून कायमचे दारिद्रय तसेच शिल्लक आहे. अनेक आदिवासी ठाकर वाड्यांमध्ये अजूनही भौतिक विकासाची कामे झाली नाही. आम्ही सर्व राज्यकर्त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सायगाव ठाकरवाडी येथे मांडली.
सायगाव (ता. खेड) येथील ठाकरवाडी येथे तीन लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकीचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. सायगाव बुट्टे पाटील यांचे जिल्हा परिषद गटात येत नसल्याने पहिल्यांदाच या ठाकरवाडीला भेट दिल्यानंतर त्यांनी इथल्या ठाकर बंधू-भगिनीशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच पुढील काळात ठाकरवाडी साठी जोडरस्ता देखील निधी उपलब्ध करून देऊ असे त्यांनी आश्वासन दिले.
आपण आपल्या जिल्हा परिषद गटात आमची ठाकरवाडी आमचा विकास हा उपक्रम राबवून 28 आदिवासी ठाकरवाड्यांमध्ये विकास योजना पोहोचवण्याचे काम केले आहे. या प्रामाणिक समाजासाठी काम करण्याची आपल्याला आवड असल्याने यापुढील काळात तालुक्यातल्या अन्य ठाकरवाड्यांमध्ये देखील विकास कामे करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरपंच मंगल पारधी, उपसरपंच सागर शेलार, ग्रामपंचायत सदस्य बबन बोरकर, रघु खंडवे, सदस्या नंदा बोंबले, यमुना बोरकर, ग्रामसेविका जयश्री काळोखे, तंटामुक्ती अध्यक्ष किसन मुरलीधर बोरकर, माजी सरपंच किसन शिवराम बोरकर, दत्ता माने, सोपान बोरकर, समीर शेलार, रमेश शेलार आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामसेविका जयश्री काळोखे, उपसरपंच सागर शेलार, किसन बोरकर यांनी देखील मनोगते व्यक्त केली.