स्मार्ट सिटी संदर्भातील शेतकऱ्यांच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घ्या – शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक
नागपूर : नागपूर स्मार्ट सिटी अभियानात ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहे, त्यांना या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासात घेऊन त्यांच्या शंका दूर करून व त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भातील अडीअडचणी दूर करून समाधान करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती भवन येथे या अभियानात जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. स्मार्ट सिटी नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व अधिनस्त कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर स्मार्ट सिटी अभियान सुरू करताना शेतकऱ्यांना मोबदल्या संदर्भात जी माहिती दिली होती ती चुकीची असेल तर वस्तुस्थिती त्यांना कळली पाहिजे. कोणत्याही शासकीय योजनेमध्ये आपली फसगत होत आहेत, असे शेतकऱ्यांना वाटणे योग्य नाही. त्यामुळे त्यांना मिळणारा मोबदला व या अभियानात पुढे होणारी कामे या बाबतची माहिती नियमित देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
अभियानाअंतर्गत कामकाजासाठी काही निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र हे निर्देश देताना शेतकऱ्यांशी समन्वय केला गेला नाही. त्यामुळे त्यांच्या अनेक शंका आहेत. या शंकांचे निरसन झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हस्तक्षेप करून सुलभतेने सगळे माहिती उपलब्ध होईल व शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भातील सर्व मुद्दे स्मार्ट सिटी संदर्भातील आगामी बैठकीत मांडले जातील, याची काळजी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. कालमर्यादेत शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन करा,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी अनेक समस्या मांडल्या.