न्यायप्रविष्ट प्रकरणांतील गरजू महिला झाल्या “स्वयंसिद्धा’
कौटुंबिक न्यायालयाच्या पुढाकाराने 56 महिलांना रोजगार प्रशिक्षण
पुणे : कौटुंबिक न्यायालयातील न्यायप्रविष्ट प्रकरणांतील गरजू महिलांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करणाऱ्या “स्वयंसिद्धा’ उपक्रमांतर्गत गेल्या पाच वर्षांत 56 महिलांनी विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
या प्रशिक्षणाच्या आधारे काही महिला खासगी क्षेत्रात नोकरी करत असून, अनेक महिलांनी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लरसारखे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून सक्षम झाल्याने या महिला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
कौटुंबिक न्यायालयातील न्यायप्रविष्ट प्रकरणात, पतीच्या आर्थिक परिस्थितीनुसार ज्यांना पोटगी कमी मिळाली आहे. ज्यांचे पती वेळेवर पोटगीची रक्कम भरत नाहीत, अशा महिलांना मुलांचे संगोपन करत संसार चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत स्वावलंबी करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाने पुढाकार घेत 2017 पासून स्वयंसिद्धा उपक्रम सुरू केला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे व न्यायाधीश मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह समुपदेशक राणी दाते व डॉ. सुरेश सुर्यवंशी या उपक्रमाचे कामकाज पाहतात.
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रेणुका स्वरुप करिअर इन्स्टिट्यूट, आयसीआयसीआय अकॅडमी फॉर स्कील्स डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राइव्ह कौशल्य विकास केंद्र, लाइट हाउस व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतर्फे या स्वयंसिद्धा महिलांना कार्यालय व्यवस्थापन, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, फ्लॉवर मेकिंग, नर्सिंग, बालवाडी प्रशिक्षक आदी विविध प्रकारच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
गरजू महिलांचे वय आणि शिक्षणानुसार अभ्यासक्रम निवडून संबंधित स्वयंसेवी संस्थेकडे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. प्रवास खर्च परवडत नाही, अशा महिलांना स्वयंसेवी संस्थांमार्फत बसपासही काढून दिला जात असल्याचे संगण्यात आले.
स्वयंसिद्धा उपक्रमाचे यश
वर्ष प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला
2017 10
2018 14
2019 15
2020 10
2021 7
कौटुंबिक न्यायालयच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कौटुंबिक कलहामुळे त्रस्त असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी स्वयंसिध्दा हा उपक्रम राबविला जातो. स्वावलंबी करण्याबरोबरच महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हा उपक्रम करतो. या उपक्रमाचा लाभ अनेक महिलांनी लाभ घेतला आहे.
-सुभाष काफरे, प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, पुणे.