खुनाच्या गुन्ह्यात पिता-पुत्रांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
पुणे: घराजवळ भिंत घालण्याच्या वादातून शेजाऱ्यांमधील भांडणामध्ये घरासमोरून उचलून नेऊन महिलेचा लाकडी काठी, दगडी पाटा, फर्शी आणि कुकरच्या झाकणाच्या सहाय्याने मारहाण करून खून केला होता. या प्रकरणात पिता-पुत्रांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एम. एम. सुंद्रेश यांनी जामीन मंजूर केला आहे. अनिल मधुकर हेंद्रे आणि मुलगा सिध्देश अशी दोघांची नावे आहेत.
दोघांनी ॲड. अजिंक्य खैरे आणि ॲड. अभिषेक अवचट यांच्यामार्फत जामिनाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. आरोपी यांनी फिर्यादी विरुद्ध पूर्वीच चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. घडलेला प्रकार हा गंभीर आणि अचानक चिथावणीतून घडला आहे. स्वरक्षणासाठी आरोपींनी हे कृत्य केले आहे.
या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून, आरोपी 2019 पासून आजतागायत कैद असल्याचा युक्तिवाद ॲड. खैरे आणि ॲड. अवचट यांनी केला. याबाबत विक्रम शितोळे यांनी पत्नी कल्पना यांच्या मृत्यू प्रकरणी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात भादवी कलम 302 (खून) नुसार गुन्हा दाखल आहे. पिता-पुत्रांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.