आयव्हीएफ, सरोगसी अपयशी ठरल्याने सनी लिओनीने घेतली मुलगी दत्तक
मुंबई : सध्याची बदललेली जीवनशैली, करिअर यामुळे अनेक दापंत्यांना अपत्यप्राप्तीबाबत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातून मग काही दांपत्ये इन व्हिट्रो फर्टिलायझेशन उपचारपद्धतीकडे वळतात. आय.व्ही.एफ. या पद्धतीमध्ये, स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्राणू या दोघांचे मीलन शरीराबाहेर केले जाते. या उपचार पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांडनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन देऊन ही बीजांडे बाहेर काढली जातात. त्यानंतर पुरुषाच्या वृषणामध्ये तयार होणारे शुक्रजंतूदेखील एका जारमध्ये जमा करून, बीजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो.
हे भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जातात. त्यानंतर यातील चांगल्या प्रतीचे भ्रूण हे स्त्रीच्या गर्भाशयात परत सोडले जातात. त्यानंतर दोन आठवडय़ांनी या उपचार पद्धतीने गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे रक्ताची चाचणी करून ठरवण्यात येते. सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुषांमध्ये कामामुळे वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, बदललेला आहार या सर्व गोष्टींमुळे जवळ जवळ ३०-४० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. अशा जोडप्यांसाठी ही उपचार पद्धती एक प्रकारे वरदानच ठरली आहे.
अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनीही या पद्धतीने अपत्यप्राप्ती होण्यासाठी प्रयत्न केला होता. पण त्यातून गर्भधारणा होऊ शकली नाही. मात्र, दोघांनाही अपत्याची फार ओढ असल्याने त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार होणारे भ्रूण भाडोत्री महिलेच्या गर्भात वाढवण्याचे (सरोगसी) प्रयत्नही करून पाहिले. त्यात अपयश आल्याने दोघांनी लातूरला जाऊन तेथील अनाथालयातून 2017 मध्ये 21 महिन्यांची एक मुलगी दत्तक घेतली. पाठोपाठ 2018 मध्ये त्यांना सरोगसीद्वारे दोन मुलगे झाले.
आता इतक्या वर्षानंतर सनी लिओनीने एका मुलाखतीत अपत्यप्राप्तीबाबतची ओढ, आयव्हीएफ आणि सरोगसीच्या प्रयत्नात आलेले अपयश, मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय याबाबत सांगितले आहे. आता या अपत्याला निशा ही मुलगी आणि आशर व नोह हे मुलगे अशी तीन अपत्ये आहेत.
या अभिनेत्रीने सांगितले आहे की, आयव्हीएफ प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे सहा भ्रूण होते. त्यातील चार मुलींचे तर दोन मुलग्यांचे होते. त्यांनी आयव्हीएफद्वारे अपत्यप्राप्तीचा प्रयत्न अमेरिकेत केला होता. त्याठिकाणी भ्रूणाचे लिंग सांगितले जाते. भारतात मात्र याबाबत अतिशय कडक कायदे आहेत.
आयव्हीएफद्वारे मुलींना जन्म देण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला पण त्यात यश आले नाही. त्यामुळे निराश झालेल्या या दांपत्याने 2017 मध्ये मुलगी दत्तक घेतली. त्यानंतर राहिलेले मुलग्यांचे भ्रूण सरोगसीद्वारे एका महिलेच्या गर्भाशयात वाढण्यासाठी ठेवण्यात आले. त्यामध्ये यश येऊन 2018 मध्ये आशर आणि नोहचा जन्म झाला. मग दोघेही त्या मुलांना पाहण्यासाठी अमेरिकेत गेले.
सनी म्हणते, आशर आणि नोह ही आमची मुले असली तरी निशाबरोबर आमचे हृदयाचे नाते आहे. बाकीच्या कुठल्याही मार्गाने अपत्यप्राप्ती होण्याची चिन्हे दिसत ऩसल्याने आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी देखील खूप थांबावे लागले, खूप कागदपत्रे जमा करावी लागली. सगळे काही कायद्यानुसार झाल्यानंतर निशा आमच्या घरी आली. आता आमची तीन अपत्ये मजेत राहतात.
सनीने नुकतेच मधुबन मे राधिका नाचे या अल्बममध्ये नृत्य केले आहे. त्यावरूनही मोठा वाद झाला. धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करून अल्बम मागे घेण्याची मागणी करण्यात
आली.