महाराष्ट्र सदनात रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम; महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे घडणार दर्शन
नवी दिल्ली : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार 12 जून 2022 रोजी येथील महाराष्ट्र सदनात करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, दिल्लीस्थित महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात रविवारी सायं 6 ते रात्री 9 दरम्यान हा कार्यक्रम होईल. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान- प्रदानासाठी करार झाला आहे. हा पार्श्वभूमीवर उभय राज्यांतील सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या उद्देशाने हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र आणि ओडिशाच्या लोककलांचे घडणार दर्शन
ओडिशातील ‘प्रतिवा समूह’ आणि महाराष्ट्राकडून सांगली येथील ‘शाहीर शुभम विभूते आणि पार्टी’ नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उभय राज्यांतील समृध्द लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. ओडिशातील समृध्द आदिवासी परंपरा, विविध विधीकार्य प्रसंगी तसेच सण-समारंभावेळी सादर होणाऱ्या लोककलांचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे. तसेच, महाराष्ट्राला समृध्द करणारी ग्रामीण, आध्यात्मिक परंपरा दर्शविणाऱ्या लोककलांचे सादरीकरण या कार्यक्रमात घडणार आहे.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील मराठी व उडिया समुदायासह अन्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उभय राज्यांचा समृध्द सांस्कृतिक वारसा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.