क्रीडा आणि ‘शिष्यवृत्ती’मधील यशानंतर गावकारभा-यांकडून गुणवंतांच्या पाठिवर शाबासकीची थाप
शंभर मीटर धावणे शर्यतीत मोहिनी राठोड द्वितीय, शिष्यवृत्ती परीक्षेतील २५० गुण मिळवत सुप्रिया सुवासे जिल्हा गुणवत्ता यादीत
खेड । सह्याद्री लाइव्ह । बालेवाडी (महाळुंगे) येथील श्री छत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये होलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मोहिनी संदेश राठोड हिने यशस्वी ‘धाव’ घेतली. या स्पर्धेत मोहिनी हिने १०० मी धावणे मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून खेड तालुक्यासह होलेवाडी गावच्या नाव उज्ज्वल केले. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीमधील सुप्रिया दादासाहेब सवासे हिने २५० गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत नाव झळकविले.
क्रीडा क्षेत्रात मोहिनी राठोड आणि शिष्यवृत्ती परीक्षेत सुप्रिया सवासे या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. शाळेतील विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, सरपंच मोनिका मंगेश होले, माजी उपसरपंच नितीन होले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा शनिवारी (दि. १४) सत्कार करण्यात आला. यावेळी होलेवाडी गावचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, उद्योजक बबन होले, ‘महापारेषण’चे उपव्यवस्थापक विश्वास होले, सामाजिक कार्यकर्ते अरुण होले, प्रगतशील शेतकरी विठ्ठल होले, ज्ञानेश्वर होले आदी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संदीप काळे, शिक्षिका रोहिणी लांघी, नूतन कडलग, संगीता दिघे, पुष्पांजली राळे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी होले, उपाध्यक्ष प्रवीण होले यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.