विद्यार्थ्यांना लवकरच ‘कोरडा पोषण आहार’
शालेय योजनेअंतर्गत सात महिन्यांचा तांदूळ व धान्यादी देणार करोना संकट काळात मोठा दिलासा मिळणार
पुणे : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाच्या स्वरुपात सात महिन्यांच्या कोरड्या आहाराचे वाटप करण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे ऐन करोनाच्या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 1 हजार 700 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी उपलब्ध करुन दिला जात असतो.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा चालू-बंद होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देण्याऐवजी तो कोरड्या स्वरुपात देण्याचा निर्णय शासन स्तरावरुनच घेण्यात आलेला आहे. पोषण आहार योजनेअंतर्गत राज्यातील 86 हजार 500 शाळांमधील 1 कोटी 2 लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत असतो. शैक्षणिक वर्ष 15 जून पासूनच सुरु झालेले आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांचा पोषण आहार हा जून्या पुरवठादारांकडून देण्यात आला होता.
शाळांना तांदूळ व धान्याची मालाचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. काही अडचणीमुळे ही निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच विलंब लागला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सुमारे 145 पुरवठादारांनी निविदा दाखल केल्या होत्या. यातील पात्र पुरवठादारांना दर कमी करण्याबाबत वाटाघाटी करण्यात आल्या. याला पुरवठादारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे शासनाचे सुमारे 40 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
ऑगस्ट ते फेब्रुवारी अशा सात महिन्यांचा आहार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 15 किलो 400 ग्रॅम तांदूळ, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 23 किलो 600 ग्रॅम तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच एक डाळ व कडधान्येही वाटप होणार आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांसाठी पुरवठादारांबरोबर कामांचे करारनामेही करण्यात आले आहेत.
उर्वरित जिल्ह्यांसाठी न्यायालयीन प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे तुर्तात त्या ठिकाणासाठी करारनामे झालेले नाहीत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन उत्तम दर्जाच्या आहाराचा मुदतीत पुरवठा करण्याबाबत पुरवठादारांना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.