विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्काराचे, सर्वधर्मसमभावाचे मूल्य रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनच्या माध्यमातून केले जाते. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी. जीवनात सेवा व त्याग या मूलमंत्राचा स्वीकार करून समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे केले.कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत तिवसा तालुक्यातील शेंडोळा खुर्द येथे शासकीय औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनच्या निवासी श्रम संस्कार शिबिराला ठाकूर यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा आमले, तिवस्याच्या पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखेडे, तिवसा सरपंच मुकुंद पुनसे, शेंडोळा खुर्दचे सरपंच अर्चना चिकटे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक देवतळे, मोझरीच्या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे, शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र लोखंडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश साबळे, उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व, छंद, सवयी, दृष्टिकोन, जीवनावश्यक मुल्ये व क्षमता विकसीत कराव्या. अनुभव व जिज्ञासु वृत्तीची जोपासना करावी. रासेयोच्या माध्यमातुन शिकवण्यात येणारी शिस्तबद्धता अंगी बाणवावी. जीवनात यशस्वी होण्याचे हे सुत्र सर्वांनी आत्मसात करण्याबाबत ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले.
शिबिरात गुरुकुंज मोझरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. दिनांक 27 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ग्रामस्वच्छता, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रभात फेरी, अंधश्रद्धा निर्मुलन, सामुदायिक प्रार्थना, मानवी जीवनात संस्काराचे महत्व आदी विषयांवर व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे यांनी दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.भातकुली तालुक्यातील आष्टी येथील बीएसएफचे जवान शहिद कॉन्स्टेबल संजय जवंजाळ यांना कर्तव्यावर असतांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन ठाकुर यांनी त्यांना धीर दिला.