भोरच्या सविता तनपुरे यांना राज्यस्तरीय तेजस्विनी पुरस्कार
भोर । सह्याद्री लाइव्ह । धोंडेवाडी (ता.भोर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका सविता तनपुरे यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तेजस्विनी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. रत्नागिरी येथील उद्यमनगर नजीकच्या चंपक मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, आमदार योगेश कदम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे शहराध्यक्ष सचिन डिंबळे, पुणे जिल्हा शिक्षकसंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, पोपटराव निगडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तनपुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी युट्युब वर शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती, शैक्षणिक उठावातून भौतिक सुविधा, डिजिटल शाळा, स्वानंदी शिक्षण व संविधान या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. किशोरी मेळावा, मातापालक मेळावा इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.