आर्थिक शिस्त आणि समतोल विकासाच्या अर्थसंकल्पासह राज्य अग्रेसर
वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई
मुंबई: मागील दोन वर्षापासून कोविडसारख्या महामारीचा सामना करीत असताना राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आली असतानाही आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसवली आहे. वित्त विभागाने नियोजन करुन, आर्थिक शिस्त लावून सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्याद्वारे राज्य समतोल विकासाच्या दृष्टिने पाऊल पुढे टाकत आहे, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सन 2022-23 च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेवर उत्तर देताना वित्त राज्यमंत्री श्री. देसाई बोलत होते.
वित्त राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. 2020-21 मध्ये कोविडची परिस्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावर झाला. विविध योजनासाठी जवळपास 60 ते 70 टक्के निधी देण्यात आलेला आहे. कुठल्याही योजनेच्या निधीमध्ये कपात करण्यात आली नसल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले की, इतर राज्यांच्या तुलनेत 2.64 टक्के कर्ज कमी घेवून राज्याने अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) चे 26 हजार 500 कोटी रुपये येणे बाकी आहेत. कररुपाने वाटा उचलणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे.
कोविडकाळात नागरिकांच्या पाठिशी ठाम उभे राहून कोविडच्या कामासाठी कुठेही सरकारच्यावतीने पैसा कमी पडू दिला नाही. राज्यात अनेक ऑक्सिजन प्लांट, रुग्णालये, उभारले. तसेच प्रत्येक जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट उभारुन राज्याला स्वयंपूर्ण बनविले. करचुकवेगिरीला आळा घालून अधिक उत्पन्न वाढ कशी होईल, यासाठी प्रयत्न केले. राजकोषीय तूट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उद्योग विभागामध्ये आतापर्यंत 98 सामंजस्य करार करण्यात आले असून चार लाख कोटी रुपये गुंतवणूकीच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी चालना देण्यात आली आहे. सद्यस्थितीत 98 प्रकल्पापैकी 5 प्रकल्प प्रलंबित असून उर्वरित सर्व प्रकरणे मार्गी लागली आहेत.
सारथी, बार्टी आणि महाज्योती या तीनही महामंडळाचा निधी मागणीप्रमाणे नियोजनामध्ये प्राप्त करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मद्यतस्करी रोखण्यासाठी विदेशी मद्यावरील कर कमी करण्याचा प्रायोगिक तत्वावर शासनाने निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या उत्पनामध्ये वाढ झाली.
सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले. रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्यावर संग्रहालयाला सर्व निधी देवून संग्रहालयाचे काम मार्गी लावले जाईल.
कृषि क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत महिलांसाठी ज्या योजना आहेत. त्यांच्यासाठी तीस टक्के वाटा होता. तो वाढवून 50 टक्के ठेवला जाईल. 2022-23 च्या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोविडच्या परिस्थितीमुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही. कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, विभागीय असमतोल होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही वित्तराज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात असून चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. तसेच त्याचे उपकेंद्र नवी मुंबई येथे उभारण्यात येणार आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास विभागाच्या योजना शहर व महानगरासह ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोविड परिस्थितीमुळे मागील कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले होते. आता ते ऑफलाईन सुरु केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून कौशल्य विकास विभागाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री.देसाई यांनी सांगितले.
गृहविभागाला सीएसआर फंडाच्या माध्यमातून पोलीसांसाठी गाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या.
रोजगार हमी योजनेचे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे निधीचे वितरण केले जाईल. वाईच्या पाठशाळेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवी स्थळाचा आरखडा तयार केला असून याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरखड्यासाठी आधिकचा वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.
सन 2022-23 च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, विनायक मेटे, शशिकांत शिंदे, डॉ.परिणय फुके, संजय दौंड, निरंजन डावखरे, निलय नाईक, डॉ.रणजित पाटील, सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर, विक्रम काळे, रामदास आंबटकर, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, कपिल पाटील, प्रसाद लाड, श्रीमती प्रज्ञा सातव आदींनी सहभाग घेतला होता.