‘एसटी’ ही सामान्यांची जीवन वाहिनी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
सावली येथे नवीन बस स्थानकाचे लोकार्पण
चंद्रपूर : कोरोनाच्या काळात एसटीचा प्रवास अतिशय खडतर झाला. एक वेळ तर असे वाटले की, एसटी पुन्हा रस्त्यावर धावते की नाही. मात्र राज्य शासनाने अतिरिक्त दीड हजार कोटीची आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली. ग्रामीण व सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ही एक प्रकारची जीवनवाहिनी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
सावली येथे नवीन बसस्थानकाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष लता लाकडे उपप्रादेशिक परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, गडचिरोलीचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, अधिवक्ता रामभाऊ मेश्राम, विजय कोरेवार, विलास विकार नगरपंचायतचे उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार चंद्रपूरच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे कार्यकारी, अभियंता नरेंद्र खांडेकर आदी उपस्थित होते.
सावली येथील नवीन बसस्थानक हे शहर व तालुक्याच्या दृष्टीने विकासाच्या बाबतीत एक मानाचा तुरा आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, या बस स्थानकासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. सुरुवातीला ही जागा जलसंपदा विभागाची होती. ती बस स्थानकासाठी हस्तांतरीत करण्यात आली. या शहरात सुंदर बस स्थानक व्हावे, यासाठी तीन वेळा डिझाईन मध्ये बदल करण्यात आला. बसस्थानक छोटे असले तरी त्यात सर्व सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. आजूबाजूचे काही बसस्थानक केवळ नावासाठी मोठे असून पाऊस आला तर प्रवाशांना ओले व्हावे लागते. अशी परिस्थिती या बसस्थानकावर येणार नाही, याची काळजी घेतली आहे. येथे सर्व सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देऊ. येथील संरक्षण भिंत, काँक्रिटचे रस्ते आदींसाठी अतिरिक्त दीड कोटीचा निधी देण्यात येईल. 2 कोटी 64 लाख रुपये खर्च करून हे बसस्थानक उभे झाले आहे.
पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना जास्त वेतन देण्यात येते. मागच्या काळात संपामुळे मोठ्या प्रमाणात एसटीचे व कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले. मात्र राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला आणि पुढेही कर्मचा-यांच्या पाठीशी सरकार आहे. बसस्टँडच्या मागे असलेल्या खुल्या जागेत अडीच कोटी रुपये खर्च करून महात्मा फुले उद्यान बनविण्यात येईल. विकास व सौंदर्यीकरणाच्या बाबतीत सावली आता बदलत आहे. येथे रमाई सभागृहासाठी तीन कोटी मंजूर झाले असून पाच कोटीची नगरपंचायत इमारत साकारण्यात येत आहे. येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आणखी दहा कोटी रुपये देण्यात येईल. सावली हरंबा रस्त्यासाठी 22 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल. या परिसरात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काही प्रतिनिधी नुकतेच येऊन गेले. ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी त्यांना शंभर एकर जागा आवश्यक आहे. या माध्यमातून येथे साखर उद्योग इथेनॉल उद्योग प्रस्तावित आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. उद्योग, शेती, सिंचन, व्यवसाय आदी सर्व बाबतीत नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण केले जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ओबीसी नागरिकांसाठी सावित्रीबाई फुले आवास ही स्वतंत्र घरकुल योजना अंतिम टप्प्यात आहे.
तसेच पूर्वी केवळ दहा ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची तरतूद होती. आता या जागा 10 वरून 100 पर्यंत वाढविण्यात आल्या आहे. आता ओबीसीचे 100 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील. त्यासाठी त्यांना प्रत्येकी 20 लक्ष रुपये शासनामार्फत दिले जाईल. येथील बस स्थानक हे लोकांच्या सेवेसाठी आहे. शहरातील नागरिक आणि प्रवाशांनी सुद्धा हे बसस्थानक स्वच्छ ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले. कोरोनाच्या काळातही ही सुंदर वास्तू उभारल्याबद्दल त्यांनी प्रादेशिक परिवहन महामंडळाचे कौतुक देखील केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना स्वयंचलित ट्राय सायकल मोफत देण्यात आली. तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करून पट्टे वाटप करण्यात आले. सोबतच नागरिकांना वैयक्तिक वनहक्क पट्टे वाटप व ग्रामपंचायतींना सामुहिक वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले. यात कुंदा शंकर दडमल, शारदा प्रमोद मस्के, मुक्ताबाई मधुकर घोडमारे, शालिनी प्रकाश दडमल, मीरा दडमल, लीला मेश्राम, भास्कर मेश्राम, संगीता मडावी, सखुबाई कन्नाके आदिंचा समावेश होता. यावेळी पालकमंत्र्यांनी बस स्थानकाची पाहणी केली.
प्रास्ताविकात विभाग नियंत्रक वाडी भस्मे म्हणाले, सावली शहरात सुसज्ज बस स्थानक उभे झाले आहे. 2500 चौरस मीटर एवढ्या जागेवर 2 कोटी 64 लाख रुपये खर्च करून हे बसस्थानक बांधले आहे. यात सहा फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, तिकीट कक्ष, चौकशी व पास वितरण कक्ष, जेनेरिक मेडिकल स्टोअर, चार वाणिज्य आस्थापना, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, आदींचा समावेश आहे. नागरिकांनी खाजगी वाहने किंवा काळीपिवळीने प्रवास टाळावा व एसटीला सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी केले.