दक्षिण वाहिनी भीमातिरी अधिक श्रावणमासनिमित्त श्रीमद् भागवतकथा सप्ताह
होलेवाडी । सह्याद्री लाइव्ह । अधिक श्रावणमासनिमित्त राजगुरुनगर येथील दासानुदास भक्त मंडळाच्या वतीने होलेवाडी (श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ, सिद्धेश्वरनगर) येथे श्रीमद् भागवतकथा सप्ताहास प्रारंभ झाला आहे. दक्षिण वाहिनी भीमानदीतीरी सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा साजरा होत आहे.
ह. भ. प. लक्ष्मण महाराज रेटवडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव हिरामण पडवळ, खरपुडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मोहन काशिद, उद्योजक बी. के. लोमटे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शिर्के यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
दासानुदास भक्त मंडळातर्फे गुरुवापासून (दि. २०) श्रीमद् भागवतकथा सप्ताहाला मोठ्या उत्साहामध्ये सुरूवात झाली. दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ह. भ. प. साहेबराव महाराज जाधव (आळंदीकर) यांच्या श्रीमद भागवत कथेची श्रवणभक्ती आणि धूपारती होते. त्यानंतर भाविकांनी आणलेल्या प्रसादाचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता होते. दत्तजन्म, श्रीकृष्णजन्म, गोवर्धन पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात आले.
येत्या गुरुवारी (दि. २७) ह. भ. प. इंद्रजित महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या श्रीमद् भागवतकथा सप्ताहाची सांगता होणार आहे. या शेवटच्या दिवशी स्वर्गीय अशोक शंकरराव गुरव यांच्या स्मरणार्थ चिरंजीव प्रा. समीर अशोक गुरव आणि सून समृद्धी समीर गुरव यांनी महाप्रसाद ठेवला आहे.