क्रीडा व व्यवस्थापन संस्थेने सर्वोत्तम खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेवावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डोळ्यांपुढे निश्चित असे ध्येय ठेवून वाटचाल केली पाहिजे. क्रीडा व व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनी देशासाठी सर्वोत्तम खेळाडू निर्माण करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
विनीत कर्णिक लिखित ‘बिझनेस ऑफ स्पोर्ट्स : द विनिंग फॉर्मुला फॉर सक्सेस’ या क्रीडा व व्यवस्थापन क्षेत्रासंबंधित शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ६) राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलते होते.
कसोटी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (आयआयएसएम) या संस्थेने सदर पुस्तक तयार केले असून पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे.
अलीकडेच भारताने बॅडमिंटन मधील प्रतिष्ठेचा थॉमस कप जिंकल्याचे नमूद करून आजच्या स्पर्धात्मक युगात खेळाडूंमध्ये स्पर्धेसाठी जिद्द, उन्नत मनोबल तसेच सांघिक भावना निर्माण करणे गरजेचे आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना विविध क्षेत्रात चांगले खेळाडू घडवले गेले तर त्याचा देशाला फायदा होईल, असे राज्यपालांनी सांगितले.