वराळे येथे आदिवासी मुलांच्या खास गुण, कलेचे विज्ञान प्रदर्शन
तळेगाव दाभाडे येथील वर्क फॉर इक्वालिटी या सामाजिक संस्थेचा पुढाकार
राजगुरुनगर : आदिवासी समाजातील मुले आपल्याला शिक्षणात, लिखाणात नेहमीच मागे पडलेली दिसतात. परंतु त्यांच्याकडे त्यांच्या काही उपजत क्षमता आहेत, ज्याला पुढे आणण्याची व त्याला सन्मानित करण्याची गरज आहे. जेणेकरून ही मुले याच ज्ञानाचा उपयोग करून स्वतःच्या पायावर आत्मसन्मानाने उभी राहू शकतात. या मुलांमध्ये असलेले ज्ञान पुढे आणण्याची संधी तळेगाव दाभाडे येथील वर्क फॉर इक्वालिटी या सामाजिक संस्थेने वराळे (ता. खेड) येथे दिली. शुक्रवारी (दि. २९) आदिवासी मुलांच्या खास ज्ञानाच्या वैशिष्ट्याने नटलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या मुलांकडे असलेल्या या ज्ञानाची शिदोरी सर्वांना मिळावी म्हणून ‘वर्क फॉर इक्वालिटी’ या सामाजिक संस्थेने विज्ञान प्रदर्शन व त्यावर आधारीत “शोध – मुलांचे विज्ञान प्रकल्प” हे पुस्तक मुलांच्याच भाषेत प्रकाशित केले आहे .
पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील आणि गटशिक्षणधिकारी जीवन कोकणे, शिंडर कंपनीचे अधिकारी प्रसन्ना पोतदार, सतीश रेवाना, दिनेश कामत, विज्ञान अभ्यासक आणि प्रचारक ज्योती हिरेमठ, निसर्गप्रेमी आणि शेती अभ्यासक आफ्रिन काळे यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
हे अलिखित ज्ञान पुढे येण्याची खूप गरज आहे. हे ज्ञान जीवन जगताना खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. या ज्ञानाच्या आधारे जर या मुलांचे मूल्यमापन केले, तर ते इतर मुलांना खूप मागे टाकतील. पण दुर्दैवाने या ज्ञानाला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेच स्थान दिले जात नाही, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी शिंडर इंडिया प्रा. लि. या कंपनीने सहकार्य केले, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली. या कामात संस्थेचे सर्व कार्यकर्ते स्नेहल ठक्कर, श्रद्धा तेलंगे, सूरज कांबळे, रसिका गावडे, आशा शेख, प्रियांका नाईकडे, रोहिणी कोरडे यांनी मुलांसोबत प्रकल्पासाठी काम केले, तर बसवंत विठाबाई बाबाराव या पर्यावरण अभ्यासकाचे या प्रकल्पाला मार्गदर्शन मिळाले.
ऐकावे आणि पहावे ते नवलंच…
या विज्ञान प्रदर्शनात आदिवासी मुलांमध्ये झाडे, फुले, पाने, पक्षी, जमीन, जंगल यावर आधारित ज्ञान आहे, असे प्रकर्षाने जाणवले. १० वर्षांची ऐश्वर्या त्यांच्या परिसरातील नदीत आणि विहिरींमध्ये असलेल्या किमान १५ ते २० वेगवेगळ्या माशांची माहिती पटापट सांगते. १० वर्षांचा कार्तिक नुसत्या पक्षांच्या पंखावरून किमान १२ ते १५ पक्षांची नावे सांगू शकतो. १५ वर्षांच्या अश्विनीने तिच्याच परिसरातील ६० प्रकारच्या बिया जमा करून त्याचे जतन करण्याची सुरुवात केली आहे. १५ वर्षांचा योगेश ताजे झाडावर चढून काढलेले मधाचे पोळ तोंडाला लावून मिटक्या मारत मारत खातो आणि जंगलात कोणकोणत्या प्रकारचे मध मिळते, ते कसे काढायचे, कोणत्या प्रकारचे मध खायला चांगले, अशी अचंबित करणारी माहिती सांगतो.