प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषण प्रश्न कायमस्वरुपी सोडवा – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
कोल्हापूर । सह्याद्री लाइव्ह । प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, अशा सूचना देवून यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के, विभागीय आयुक्त सौरभ राव प्रादेशिक अधिकारी जे एच साळुंखे, एमआयडीसीचे विशेष कार्य अधिकारी एस. बी. पाटील दूरदृश्यप्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, कार्यकारी अभियंता अतुल डोरे, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड आदी कोल्हापूर मधून उपस्थित होते.
कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठीचे प्रकल्प नियमित राबवून प्रदूषण नियंत्रणासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. या दृष्टीने त्या त्या विभागांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा, जेणेकरुन या अहवालातील बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन पंचगंगेचे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात यश येईल.