जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी स्कायवॉक अत्यंत महत्त्वपूर्ण – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती : विदर्भाचे नंदनवन म्हणून चिखलदरा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी स्कायवॉक झाल्यास पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल व आदिवासी भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये विविध गोरगरीब कुटुंब यांना रोजगार प्राप्त होईलच शिवाय स्थानिक कुटुंबियांचे कामानिमित्त अन्यत्र स्थलांतर रोखले जाईल. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने स्कायवॉक प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले .
जिल्ह्यातील चिखलदरा क्षेत्रातील टायगर ब्लॉक प्रोजेक्टअंतर्गत बफर झोनमधील महाराष्ट्राच्या सिडको विभागाद्वारे ग्लास स्कायवॉकचे काम सुरू आहे. या स्कायवॉक निर्मितीला गती यावी यासाठी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार केंद्र शासनाकडून परवानगी मिळून स्काय वॉक निर्मितीतील अडथळा दूर झाला आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्काय वॉक चिखलदरा येथे व्हावा यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. स्कायवॉकसाठी केंद्र व राज्य शासनासोबत व संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार करून स्कायवॉकला परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आल्यामुळे श्री. कडू यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीतील बैठकीत याविषयी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुराव्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी शासनाकडून केंद्र शासनाकडे तत्काळ पाठपुरावा होऊन परवानगी प्राप्त झाली आहे. स्काय वॉक विकासाला गती मिळणार आहे.