धक्कादायक : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौकशी अहवाल लपविला
पंचायत समिती माजी उपसभापती अमोल पवार यांचा आरोप
खेड बाजार समितीच्या सभापती व सचिव यांच्या कारभाराबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल दडवून का ठेवला आहे. त्यामध्ये नक्की दोषी कोण आहे. दोषींवर कारवाई का होत नाही, हा चौकशी अहवाल शेतकरी सभासद व जनतेसमोर आणावा, अशी मागणी खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी केली आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या बैल बाजार कॉंक्रिटीकरण कामातील वाढीव रकमेच्या निविदा स्वीकारल्या. याबरोबरच चाकण बाजारातील तरकारी विक्रीसाठी व्यापारी गाळे शिल्लक नसताना 26 लायसन्स परस्पर वाटप केल्याबद्दल सभापती विनायक घुमटकर व प्रभारी सचिव बाळासाहेब धन्द्रे यांचे सह्यांचे अधिकारी संचालकांच्या सभेत काढून घेण्यात आले होते. त्यानंतर संचालक मंडळांनी सहा संचालकांची चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल तयार केला. चौकशी समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक संचालक होते. त्यांच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यात आला; मात्र तो जनतेपुढे का आणला नाही. शिवाय या सर्व घडामोडीनंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सभापती विनायक घुमटकर यांना क्लीन चिट दिली होती.
चाकण बैल बाजार कॉंक्रिटीकरण कामाच्या टेंडर प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नसल्याचा सभापतींवर आरोप होता. तसेच चाकण बाजारातील तरकारी विक्रीसाठी व्यापारी गाळे शिल्लक नसताना व्यापारी गाळे लायसन्स देऊ नये, असा ठराव झाला असताना 26 लायसन्स परस्पर वाटप केल्याचा आरोप सभापती विनायक घुमटकर, प्रभारी सचिव बाळासाहेब धन्द्रे यांच्यावर करण्यात आला. यावर संचालक सभेत चौकशी समिती नेमण्याचे ठरले असून, चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत सह्यांचे अधिकार बाजार समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ संचालक चंद्रकांत इंगवले याना देण्यात आले होते ते अजून पर्यंत आहेत. एकीकडे सभापती घुमटकर यांना क्लीन चिट तर दुसरीकडे सह्यांचे अधिकार दादा इंगवले यांना दिले आहेत. ऑगष्ट 2021 मध्ये ते देण्यात आले. मात्र अजून पर्यंत चौकशी समितीचा अहवाल जनतेसमोर आलाच नसल्याचा आरोप खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.
अमोल पवार म्हणाले, चाकण बाजार कॉंक्रिटीकरण टेंडर प्रक्रिया व बाजार गाळे वाटप यावरून सभापती विनायक घुमटकर व प्रभारी सचिव बाळासाहेब धन्द्रे यांचे सह्यांचे अधिकारी संचालकांच्या सभेत काढून घेण्यात आले होते. त्यानंतर संचालक मंडळाने सहा संचालकांची चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल तयार केला; मात्र तो जनतेसमोर आला नाही. सभापती विनायक घुमटकर यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली तर मग हा अपहार कोणी केला. यात दोषी कोण? आरोप करणारे गप्प का आहेत. चौकशी अहवाल लपविण्याचा प्रयत्न बाजार समिती करीत आहे का? व्हेंटिलेटर खरेदीमध्ये कोणी अपहार केला. हा अपहार झाल्याचे काही संचालक खुलेआम सांगत आहेत. हा चौकशी अहवाल जनतेसमोर आणावा. अन्यथा याबाबत शेतकरी वर्गातून आवाज उठवला जाईल. वेळप्रसंगी कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे.
निवडणूक प्रक्रियेवर हरकत
बाजार समितीची निवडणूक प्रकिया सुरु झाली असून, मतदार यादी प्रसिद्द झाली आहे. त्यावर अमोल पवार यांनी हरकत घेतली आहे. तालुक्यात 104 विकास सोसायट्यांपैकी 49 सोसायटीची त्यांना दिलेली मुदतवाढ संपली आहे. त्याचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. त्या मतदारांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी व उमेदवार राहण्याचा अधिकार राहत नाही, याबाबत हरकत घेतली आहे; मात्र औरंगाबाद खंडपीठाने बाजार समितीच्या निवडणुका ह्याबाबत याचिका दाखल झाल्या. त्यावर खंडपीठाने विकास सोसायट्यांच्या अगोदर निवडणूक घ्याव्यात व त्यानंतर बाजार समितीच्या निवडणूक घ्याव्यात असा निर्णय दिल्याने पुढील काळात 92 सोसायटीच्या निवडणुका होणार आहेत. तेच संचालक बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.