चाकण उपबाजारात ऑक्शन हॉल उभारा
खेड बाजार समितीकडे कॉंग्रेस किसान सेलची निवेदनाद्वारे मागणी
खेड – चाकण बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमालाचे नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान टाळण्यासाठी ऑक्शन हॉलची उभारणी करावी, शुद्ध पिण्याच्या पाणीपुरवठा करणे तसेच जनावरांच्या बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याचे पक्के काम करावे आदी मागण्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कॉंग्रेस किसान सेलच्या वतीने करण्यात आल्या.
चाकण मार्केटमध्ये कॉंग्रेस किसान सेलच्या वतीने बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्याकडे वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे, तालुका अध्यक्ष सुभाष होले, आडते असोसिएशनचे अध्यक्ष जमीर काझी, भास्कर तुळवे, चाकण शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, अमोल दौंडकर, कुमार गोरे, भरत गोरे, सरूबाई करंडे, मयूर अगरकर, अनिल देशमुख, बापूसाहेब वाघ, गोविंद दौंडकर आदी शेतकरी वर्ग उपस्थित होते.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी आलेला कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीकडे तत्काळ पत्राशेड उभारणीची मागणी करण्यात आली.