पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा तालुक्यातील पर्यटनस्थळी कलम १४४ लागू
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तु, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी काल मंगळवार (दि. १० जानेवारी २०२२) मध्यरात्री पासून कलम १४४ लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश व सूचना लागू करण्यात आल्या आहे.
पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तु, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी नागरीक व पर्यटक मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. सदर ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात नागरीकांची व पर्यटकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते.
या पर्यटनाच्या ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल मोठया प्रमाणात लावण्यात आलेले असतात. सदर खाद्य पदार्थ विक्री स्टॉलवार पर्यटक विना मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करता गर्दी करतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन इत्यादी कोविड नियमांचे पालन होताना दिसत नाही.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा प्रसार ओमिक्रॉन व्हेरियंटसह मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्या प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून दि. १० जानेवारी २०२२ मध्यरात्री पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा व ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रतिबंधीत केलेली क्षेत्रे पुढीलप्रमाणे –
मावळ : भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, शिवलिंग पॉईंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर इत्यादी.
मुळशी : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉईंट, सहारा सिटी, कोळवण परिसर इत्यादी.
हवेली : घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर इत्यादी.
आंबेगाव : डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ इत्यादी.
जुन्नर : शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र इत्यादी.
भोर : रोहडेश्वर / विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड इत्यादी.
वेल्हा : तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर इत्यादी.
वरील नमूद केलेल्या ऐतिहासिक वास्तु, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणांच्या सभोवताली १ किलोमीटर परीसरात पुढील आदेश येईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
वरील प्रतिबंधीत केलेल्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
वाहनांची ने – आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिक साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.