खेड तालुक्यात समाधानकारक पाऊस; भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात
खेड । सह्याद्री लाइव्ह । गेले काही दिवस खेड तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे भातलावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भात पिकाच्या सरासरी ७७५०.२० हेक्टर क्षेत्रापैकी ५३१५ हेक्टरवर लागवड झाली असून हे प्रमाण ६८.४८ टक्के आहे. चांगल्या पावसामुळे लावणीची कामे वेळेत उरकणार असल्याने सुरूवातीला चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे.
यंदा पावसाळा सुरू होऊनही पावसाचा पत्ता नव्हता. सुरूवातीचे करही दिवस पाऊस न पडल्यामुळे शेतीची कामे रखडली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. पंरतू गेले काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला.
पावसाच्या लहरीपणामुळेच खेड तालुक्यातील शेतकरी पेरणी, लावणी, कापणी, झोडणी ही सारी शेतीची कामे वेळेत उरकण्याच्या प्रयत्नात असतात. यापुढेही पावसाने अशीच साथ दिल्यास येत्या आठ ते दहा दिवसात भात लावणीची कामे पुर्ण होण्याची शक्यता आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य पीक भात आहे. या भागातील जवळपास सर्वच क्षेत्रावर भातलागवड केली जाते. पाऊस वेळेवर आणि तोही समाधानकारक झाला तरच शेतक-याला या पीकातून थोडेफार उत्पन्न मिळते. परंतू जर पाऊस वेळेत पडला नाही तर शेतक-यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. इतकंच नव्हे तर वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES