संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैठक संपन्न
सातारा : कोरोना संसर्गामुळे दोन वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. शासनाने आता निर्बंध शिथील केले असून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी येण्याची शक्यता गृहित धरुन नियोजन करावे. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-2022 च्या अनुषंगाने आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पालखी तळाचे व दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मुरुम व कच टाकून त्याचे सपाटीकरण करावे. फिरते शौचालय उभे करुन त्यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. शौचालयांना तात्पुरते वीज जोडणी करुन घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताच्या ठिकाणी पाण्याची योग्यता तपासावी. पालखी सोहळ्यादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाबरोबरच स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
देसाई म्हणाले, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्यांना तात्पुरती वीज जोडणी द्यावी. वीज जोडणी देताना सुरक्षेचीही काळजी घ्यावी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा खंडाळा तालुक्यात व फलटण तालुक्यात मुक्काम आहे. त्याच्या नियोजनासाठी तालुकास्तरावर बैठक घ्यावी.
बैठकीत खासदार पाटील, आमदार पाटील यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.