मराठवाड्याच्या केशर आंब्याला मिळावी कोकणात पसंती – फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे
औरंगाबाद : कोकणातील हापूस आंब्याची मराठवाड्यात मागणी असते. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील केशर आंब्याला कोकणात पसंती मिळावी, अशी अपेक्षा फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल, उत्पादक ते ग्राहक यानुसार जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या केशर आंबा विक्री केंद्रांचे मंत्री भूमरे यांच्याहस्ते ता.30 रोजी उद्घाटन झाले. यावेळी ज्योती नगरातील उद्यानात आयोजित कार्यक्रमात मंत्री भूमरे बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर, त्र्यंबक पाथ्रीकर, नंदलाल काळे, वसंतराव देशमुख, सुदामअप्पा सोळंके, सुशील बलदवा आदींची उपस्थिती होती.
मंत्री भूमरे म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांचा थेट माल विक्री करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून विक्री केंद्रांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मराठवाड्यातील केशर आंबा हा कोकणातील हापूस आंब्यासारखाच आहे. परंतु मराठवाड्यातील केशर आंब्याची प्रचार, प्रसार अधिक करण्याची आवश्यकता आहे. केशर आंब्याची गुणवत्ता अधिक आहे. विक्री केंद्रांतून ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही फायदा होणार आहे.
राज्यात पूर्वी केवळ 19 हेक्टरवर फळबाग लागवड होत होती, परंतु आता एक लाख हेक्टरच्यावर फळबाग लागवड होत असल्याचेही भूमरे म्हणाले. येथील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आरती थोरात आणि रमेश आहेर यांच्या आंबा विक्री केंद्रांचे भूमरे यांच्याहस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविक डॉ.मोटे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव साठे यांनी केले. आभार वसंतराव देशमुख यांनी मानले.