कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
पुणे । सह्याद्री लाइव्ह । कामगारांच्या आरोग्य, शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
क्रेडाई संस्थेच्या सर्वोत्तम सुविधा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीष मगर, राज्याचे अध्यक्ष सुनील फुरडे, पुण्याचे अध्यक्ष अनिल फरांदे आदी उपस्थित होते.
कामगार मंत्री खाडे म्हणाले, आपला प्रत्येक कामगार ही आपली शक्ती आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. कामगारांना सुरक्षे संदर्भात देण्यात आलेल्या सुविधांचा कामगारांनी उपयोग करावा.
कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालय स्तरावर कामगार भवन उभारण्यात येईल तसेच कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येईल. संघटित कामगारांसोबतच असंघटीत कामगारांसाठीदेखील सोई सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, कामगारांना सोईसुविधा देणाऱ्यांचा गौरव केला जात आहे, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. कामगारांना चांगल्या सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कामगाराच्या आरोग्यासाठी असलेल्या विमा योजनेसाठी कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी क्रेडाई संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी क्रेडाईचे मगर आणि फुरडे यांनी मनोगत व्यक्त केले. क्रेडाई संस्थेच्या सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील तसेच विविध उद्योग समूहांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक, तसेच कामगार उपस्थित होते.