ग्रामीण महिलांना शासनाकडून विस्तारित प्रसुतीगृहाच्या रूपाने आरोग्यदायी भेट उपलब्ध – केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार
नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील प्रसूती सेवांचास्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रयत्न करण्यात येत आहेत. या ग्रामीण रूग्णालयातील विस्तारीत प्रसुतीगृहांच्या रूपाने ग्रामीण भागातील महिलांना शासनाकडून आरोग्यदायी भेट उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विस्तारीत प्रसुतीगृहाच्या इमारतीचे लोकार्पण आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, दोडी बुद्रुक ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वप्नील पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर हे दरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोडी बुद्रुक ग्रामीण रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या माध्यमातून गरीब रूग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. स्वतंत्र प्रसूतीगृहाच्या इमारतीमुळे सन्मानपूर्वक मातृत्व या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या योजनेला बळ मिळणार आहे. तसेच संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार असून गुंतागुंतीच्या प्रसूती व सर्वसाधारण प्रसूती मातांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध होणार आहेत. नवजात अर्भकांच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यांना होणारा
संसर्ग कमी होण्यासोबतच नवजात अर्भकांचा मृत्यू व माता मृत्यू रोखण्यास हातभार लागणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवासुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी दिली आहे.