रुपाली पाटील-ठोंबरे यांचा मनसेच्या सदस्यपदाचा राजीनामा
पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. तसेच पक्षातील उपनेत्यांमुळेच आपण हे पाऊल उचलल्याचे त्या म्हणाल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाव हृदयात कोरले आहे, ते कायमच राहील. त्यांच्यामुळेच पक्षात काम करत होते. परंतु पक्षात असलेल्या रिकामटेकड्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्या म्हणाल्या.
त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत या विषयी अद्याप जाहीर केले नाही.
दरम्यान पक्षातील काही स्थानिक नेत्यांवर त्या नाराज होत्या. त्याविषयी आपण वेळोवेळी प्रमुखांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत. परंतु त्यावर काहीच विचार झाला नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्या म्हणाल्या. आपला अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कुठलाही रोष नसून ते कालही आपले दैवत होते आजही आहे आणि उद्याही राहतील असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून, लवकरच त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे.