आळंदी घाटात दुचाकीस्वाराला लुटले; रोख रक्कमसह मोबाईल पळविला
चाकण : आळंदीहून दुचाकीवर चाकणच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वारास तिघांना लुटले. रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून धूम ठोकली. आळंदी-चाकण रस्त्यावर आळंदी घाटात बुधवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी संदीप नारायण देवाडे (वय ३०, रा. साई शिवम रेसिडेन्सी, गणेश मंदिराजवळ, बालाजीनगर, ता. खेड, जि. पुणे, मूळ डिंभे कॉलनी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप देवाडे हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून (एम. एच. १४/जी.इ./३९७७) एकटे आळंदीहून चाकणच्या दिशेने निघाले. दुचाकी आळंदी घाटात आल्यानंतर फिर्यादी यांच्यासमोर काळ्या रंगाच्या दुस-या एका दुचाकीवरून ट्रीपल सीट चाकणच्या दिशेने जात होते. फिर्यादी यांनी त्या दुचाकीला ओव्हरटेक केले.
फिर्यादी यांची दुचाकी ओव्हरटेक करून पुढे गेल्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवी लावली. त्यानंतर फिर्यादी यांनी आपली दुचाकी थांबविली. आरोपींच्या दुचाकीच्या मध्यभागी बसलेली व्यक्ती खाली उतरली आणि त्याने संदीप देवाडे यांच्या शर्टची कॉलर पकडून तिघांनी मिळून हाताने फिर्यादींना बेदम मारहाण केली. त्यांच्या पॅण्टच्या खिशातून अडीच हजार रुपयांची रोकड व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर तिघे दुचाकीवर आळंदीच्या दिशेने पसार झाले.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.