पुण्यातील रस्त्यांची लवकरच डागडुजी
पुणे । सह्याद्री लाइव्ह । शहरातील रस्त्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने पाऊलं उचलली आहेत. रस्त्यांचे डांबरीकरण तसेच सिमेंटच्या रस्त्यांवर नवे थर चढवणे अशी कामे करत रस्त्यांची समस्या दुर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
यासाठी १९३ कोटींची अल्प मुदतीची निविदा काढली आहे. यामध्ये शहरातील प्रमुख ५० रस्ते विविध १४० ठिकाणी खरडून काढून पूर्णपणे डांबरीकरण केले जाणार आहे, सिमेंटच्या रस्त्यांवर सहा इंचाचा नवा थर टाकला जाणार आहे. या रस्त्यांवर भविष्यात कोणतेही खोदकाम होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
शहरात २०२३ मध्ये ‘जी २०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पथ विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर पहिल्या टप्प्यात १४० किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १९३ कोटी ४७ लाख ११ हजार ६८६ रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी निविदा मागविल्या असून, पुढील १५ दिवसांत निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांची कागदपत्रांची तपासणी व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लगेच डांबरीकरण सुरू होईल. पुढील सहा महिन्यांत हे सर्व काम संपणार आहे.