महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक निर्णय द्यावेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचना
सोलापूर : आपल्या निर्णयामुळे एकाला फायदा होतो तर दुसऱ्याचे नुकसान होते. यासाठी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी शासन निर्णय आणि कायद्याचे ज्ञान घ्यावे. त्यातील बारकावे, बदल टिपून निर्णय घ्यावेत, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या.नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप आदी उपस्थित होते.थोरात यांनी सांगितले की, नवीन शासन निर्णय आणि जुने शासन निर्णय यांचे वाचन व्हावे. प्रत्येकांनी अपडेट राहायला हवे. कोणताही निर्णय देताना विचार करून घटनेच्या तरतुदीनुसार घेणे आवश्यक आहे.
ई-पीक पाहणीची माहिती जनतेला समजावून द्यावी. याचा डेटा पणन आणि कृषी विभागाला महत्वाचा असल्याने सर्व विभागाने समन्वयाने काम करावे, असे सांगून खरीपमध्ये ७५ टक्के तर रब्बीमध्ये ६९ टक्के नोंदणी झाली आहे. ई पीक पाहणीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल आवश्यक आहेत का, याचीही माहिती थोरात यांनी घेतली.
घरपोच सातबारा उपक्रमांतर्गत सातबारा चुकीचे जाऊ नयेत, नोंदी बिनचूक व्हाव्यात, असेही त्यांनी सांगितले.वाळू लिलावातून यंदा ४६ कोटी महसूल मिळाला असून वाळू चोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भूसंपादनाबाबत दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पाणंद रस्ते, शेत रस्ते याबाबत चळवळ निर्माण व्हायला हवी. प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले.जमीन मोजण्यासाठी रोअरचा वापरजमीन मोजणीमध्ये अचूकता येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रोअर यंत्राचा वापर करावा. मोजणीसाठी कर्मचारी कमी पडत असल्याने बाह्य यंत्रणेकडून करून घेण्याचा विचार आहे.
सुंदर माझे कार्यालय उपक्रमाचे कौतुक
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने स्पर्धा घेण्यात आल्याने प्रत्येक कार्यालय सुंदर झाले आहे. या कार्यालयातून जनतेला सेवाही चांगली दिली जात असल्याने थोरात यांनी याचे कौतुक केले.
कोविड काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश
कोविड काळात कर्तव्यावर असताना कोविड१९ ने निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे धनादेश महसूलमंत्री थोरात आणि पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते देण्यात आले.कोतवाल उद्धवसिंग राजपूत आणि मंगळवेढा तहसील कार्यालयातील महसूल सहायक डी. टी. घाडगे यांच्या कुटुंबाला धनादेश देण्यात आले