परतीच्या पावसाचा शेतक-यांना फायदा
चास । सह्याद्री लाइव्ह । परतीच्या पावसामुळे शेतीला आलेल्या ओलीचा फायदा घेत तालुक्यातील शेतक-यांनी ज्वारी, गहू पेरणीला वेग आला आहे. अनुकूल वातावरणाचा फायदा झाल्यामुळे यंदा ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
या वर्षी झालेला दमदार पाऊस तसेच काही दिवसांपुर्वी झालेला परतीचा पाऊस त्यामूळे शेतीला पोषक असे वातावरण मिळाले आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जाते. त्यामूळे ओलीचा फायदा घेत ज्वारीच्या पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांत ज्वारीची वाढती मागणी तसेच जनावरांसाठी आवश्यक ज्वारीचा कडबा याचीही मागणी वाढली आहे. त्याचे भावही गगणाला भिडले असल्याने ज्वारीच्या क्षेत्रात परिणामी उत्पादनात वाढ होण्याचे हे संकेत आहेत.
खेड तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र सरासरी ८ हजार ८९३ हेक्टर आहे. त्यापैकी ३ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३३.९९ टक्के क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. मका पिकाच्या सरासरी १हजार ९६१ टक्के श्रेत्रापैकी ४२४ हेक्टर म्हणजेच २१.६२ टक्के क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. इतर तृणधान्याच्या ६८.६३ टक्के तर हरभ-याच्या सरासरी २ हजार१०९ हेक्टर पैकी १०४ हेक्टरवर म्हणजेच ४.९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. वाडामंडल क्षेत्रात ज्वारीचे सरासरी २ हजार ८३५ हेक्टर गव्हाचे ४७९ हेक्टर, तर हरभ-याचे ८६१ हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारीच्या ५० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत.