निवृत्त माजी सैनिकांनी सामाजिक बदल घडविण्यासाठी काम करावे – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ । सह्याद्री लाइव्ह। सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांनी निवृत्तीनंतर शांत न बसता सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान द्यावे. समाजाच्या हितासाठी पुढे येऊन काम करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
सीमा सुरक्षा दलाचा ५७ वा वर्धापनाचा कार्यक्रम ईश्वर नगर येथे सीमा सुरक्षा दल निवृत्त अधिकारी वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री बोलत होते. बीएसएफच्या ध्वजाचे ध्वजारोहण तसेच फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड, नगरसेवक प्राध्यापक प्रवीण प्रजापती, शिक्षणाधिकारी सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, बी एस एफ हे भारताचे एक प्रमुख निमलष्करी दल आहे. जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल म्हणुन या दलाची ओळख आहे. बी एस एफ च्या १९२ बटालियन सुमारे साडेसहा हजार लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करतात. यात पर्वतिय प्रदेश, वाळवंट, नदी-दऱ्या आणि बर्फाच्छादित प्रदेशाचा समावेश आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितित काम करुन ते आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच देशातिल नागरिक सुरक्षित आहेत.
म्हणूनच बी एस एफ मधून निवृत्त जवानांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या, वीर पत्नी व वीर माता यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले. ईश्वर नगर लेआउट मधील जागेवर सभागृह बांधण्यासाठी नियमानुसार काय तरतुदी आहेत हे जिल्हाधिकारी यांचेकडुन तपासुन घेऊन जागा उपलब्ध करुन देतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, देशात, गावात सामान्य नागरिक सुरक्षित राहण्यासाठी आपल्या जवान सीमांवर लढत असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते आपल्या देशाची सेवा करतात. कुटुंब, परिवार, नातेवाईक यांचा विचार न करता देशाच्या संरक्षणासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे सैनिकांच्या कोणत्याही समस्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून सदैव उपलब्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोडे तसेच नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनीही स्थापना दिवसानिमित्त उपस्थित सैनिकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी मेजर जीवन कोवे, गगन चव्हाण मुकेश चुडे गजानन ठाकरे याचा यावेळी ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला निवृत्त सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता उपस्थित होत्या.