खेड तालुक्यात पावसाची विश्रांती; चासकमान धरणाचे तीन दरवाजे बंद
चास । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील चासकमान धरणामध्ये ९५.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात एकूण ८.२० टीएमसी तर उपयुक्त ७.२४ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
दि. २८ जुलै रोजी चासकमान धरण ९३.२१ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे २० सेंटीमीटरने उघडून ३४९० क्युसेक वेगाने भीमानदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. परंतू धरणाच्या वरील बाजूस असणा-या आरळा नदीबरोबरच भीमानदीमधून धरणात येणा-या पाण्याची आवक थंडावली असल्यामुळे धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आणि विशेषत: चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत १ मिलीलीटर तर १ जुनपासून ३२२ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. चासकमान धरणामध्ये ८.५३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता आहे. सध्या धरणामध्ये एकूण ८.२० टीएमसी तर उपयुक्त ७.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणाच्या सांडव्याद्वारे भीमानदीपात्रात १०७० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्याद्वारे ५०० क्युसेक, तर कालव्याद्वारे नदीपात्रात ३५० क्युसेक असा एकूण १९२० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार तसेच धरणात पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग पुन्हा कमी जास्त केला जाऊ शकतो, असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES