कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधित मौजे वेळे ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधित मौजे वेळे ग्रामस्थांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे. ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या अनुषंगाने केलेल्या मागणीनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात सातारा जिल्ह्यातील कोयना वन्यजीव प्रकल्पातील प्रकल्पबाधीत लोकांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. या बैठकील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.या बैठकीला प्रधानसचिव मदत व पुनर्वसन असिमकुमार गुप्ता,डॉ.जितेंद्र दहाडे, अमोल पवार, दिपक कांबळे, चंद्रकांत कांबळे, रामचंद्र पाटील तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सातारा उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर वन विभागाचे मुख्य वनंसरक्षक समाधान चव्हाण, अलिबाग, साताराचे उपवनसंरक्षकही या बैठकीला उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मौजे वेळे, (ता. जावली), (जि. सातारा) येथील कोयना वन्यजीव – अभयारण्य प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित केलेली आहे. मौजे वेळे ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात त्यांच्या पसंतीची जमिनीची मागणी केली आहे.तरी कोल्हापूर,अलिबाग तसेच सातारा जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी व वन विभागाच्या अधिका-यांनी या प्रकरणाचा तात्काळ निपटारा करून ग्रामस्थांना त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून पुनर्वसनाची कार्यवाही करावी, अशा सूचना वडेट्टीवार यांनी केल्या.