महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करा
राज्य निवडणूक आयुक्त मदान यांची माहिती : १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येतेय विशेष कार्यक्रम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.
मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/नगरपंचायती, जिल्हा परिषदा/पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.
मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी 1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही मदान यांनी दिली.
मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी : 1 नोव्हेंबर 2021
प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे : 30 नोव्हेंबर 2021
दावे व हरकती निकाली काढणे : 20 डिसेंबर 2021 पर्यंत
अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी : 5 जानेवारी 2022
आपण हे करू शकतो
- विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे
- 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते
- आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील
- आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील
- एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा
- आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे
- नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल
नाव नोंदणी कुठे कराल?
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी-www.nvsp.in
छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे
नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने
प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास : अर्ज क्र. 6
अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी : अर्ज क्र. 6अ
इतर नावाबाबत आक्षेपासाठी,स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी : अर्ज क्र. 7
मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी : अर्ज क्र. 8
एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास : अर्ज क्र. 8अ
निवासाचा दाखला (कोणताही एक)
- जन्म दाखला
- भारतीय पारपत्र
- वाहन चालक परवाना
- बँक/ किसान/ पोस्ट
- पासबूक
- शिधावाटप पत्रिका
- प्राप्तिकर निर्देशपत्रिका
- पाणी/ दूरध्वनी/ वीज/
- गॅस देयक
- टपाल खात्याद्वारे
- प्राप्त टपाल/ पत्र
वयाचा दाखला (कोणताही एक)
- भारतीय पारपत्र
- वाहन चालक परवाना
- पॅन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- 12 वी, 10 वी, 8 वी किंवा 5 वीची गुणपत्रिका
- आधार कार्ड
- 21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3
- ऑनलाईन नाव नोंदणीसाठी
कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत
कागदपत्रांची व छायाचित्राची फाईलJPG/ JPEG असावी