वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा
दरड कोसळ्यापूर्वी दिसून येणारी सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. डोंगर उतारांना तडे जाणे, तडे गेलेला भूभाग खचू लागणे, घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड होणे, झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे, नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे मोठे होणे, त्यातून गढूळ पाणी येणे, विहीरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ किंवा घट होणे. यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये दिसलेली लक्षणे. अतिवृष्टी होत असताना झऱ्यांची पाणी क्षमता वाढणे, भात खाचरांना भेगा पडणे, जमिनीला हादरे बसणे, संपर्क साधणे निकामी होणे, घरांना तडे जाणे, भिंत कोसळणे, घरांच्या जमिनीखालून पाणी येणे, विहीर वाहू लागणे, बोअरिंगमधून पाणी उसळणे. अशी ही लक्षणे दरड कोसळण्यापूर्वी दिसून येतात.
अशी लक्षणे दिसून आल्यास गावकऱ्यांनी काय करावे?
दरड कोसळण्याची लक्षणे दिसू लागल्यास गावकऱ्यांनी तातडीने धोक्यापासून दूर होण्याचा विचार करावा. जीव वाचवणे महत्वाचे आहे. हा एकमेव विचार ठेवावा. त्यासाठी तात्पुरत्या स्थलांतरास सज्ज व्हा. त्याची तयारी म्हणून शेती, बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसा, औषधे यांची जोडणी करून ठेवावी. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले तसेच जनावरांना हवलण्यास प्राधान्य द्या.
दरड कोसळण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. सह्याद्री परिसर म्हणजे पर्वतमय, भूकंपप्रवण आणि भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे. भूकंपामुळे किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती आणि खडकांमधील सच्छिद्र भूपृष्ठाला तडे जातात. या तड्यांमध्ये पाणी जाऊन नवीन झरे निर्माण होतात. अखेरीस अतिवृष्टीमध्ये या तड्यांपासून दरडी कोसळतात. तसेच नवीन रस्ते, रेल्वेसाठीचे खोदकाम, बोगद्यांची कामे, खाणकामासाठीचे सुरुंग, शेतीसाठी, घर बांधणीसाठीचे सपाटीकरण, जंगलतोड यामुळेही दरडी कोसळतात.
दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असली तरी, ती रोखण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. दरडी थांबण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतात. डोंगर भागात अतिक्रमण करू नका, सापटीकरण टाळावे. डोंगर उतारावर बांबू सारख्या वृक्षांची लागवड करणे. पाण्याचा निचरा लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे.
विद्यार्थ्यांनो तुम्हीही सहभागी व्हा!
शिक्षकांच्या मदतीने गावाचा नकाशा प्राप्त करून डोंगर उतारावर दिसलेली दरडींची लक्षणे आणि त्यावर अधारित धोकादायक परिसराचे नकाशे तयार करु शकता. पुररेषा आखू शकता. गावाच्या पर्यावरणीय समस्यांबाबत निबंध, पथनाट्य, पोवाडे यांच्या माध्यमातून जनजागृती करा, तसेच धोकादायक परिसराचे चित्रीकरण करून पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना पाठवू शकता.
जिल्ह्यात एकूण 25 गावे दरडग्रस्त आहेत. त्यामध्ये वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 6 गावांचा समावेश आहे. दोडामार्ग तालुक्यात 4, देवगड तालुक्यात 4, सावंतवाडी तालुक्यात 3 आणि मालवण, कणकवली तालुक्यात प्रत्येकी 1 अशी दरड ग्रस्त गावे आहेत.
लक्षात ठेवा निसर्गाने दिलेला इशारा वेळीच ओळखून त्यास दिलेला प्रतिसाद हा तुमच्यासह तुमच्या कुटुंबियांचेही प्राण वाचवू शकतो. वाड वडिलांपासून रहात असलेले घर कसे सोडू असा विचार न करता आपले व आपल्या कुटुंबियांचे प्राण लाख मोलाचे आहेत ही बाब लक्षात ठेवा. दरडीच्या दुर्घटनांमधील जीवित हानी टाळण्यासाठी सजग रहा, सज्ज व्हा.